दिवंगत पोलिसांच्या कुटुंबीयांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:26 AM2020-12-16T04:26:51+5:302020-12-16T04:26:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण झाल्याने मृत झालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण झाल्याने मृत झालेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान मंगळवारी देण्यात आले. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले हवालदार प्रवीण लांजेवार आणि शिपाई संदीप भेंडे यांचा कोराेनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या हक्काचे सानुग्रह अनुदान मिळावे, यासाठी पोलीस आयुक्तालयातून आवश्यक ती कागदपत्रे पाठवून पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार सोमवारी अनुदानाचे धनादेश पोलीस मुख्यालयात पोहचले. त्यानुसार मंगळवारी सकाळी मंदिनी प्रवीण लांजेवार आणि पूनम संदीप भेंडे यांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते हे धनादेश देण्यात आले. पोलीस जिमखान्यात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त संदीप पखाले तसेच मानव संसाधन विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर प्रामुख्याने हजर होते. यापुढे तुमच्या कोणत्याही काैटुंबिक अडीअडचणी सोडण्यासाठी पोलीस विभाग नेहमी तत्पर राहील, अशी ग्वाही यावेळी पोलीस आयुक्तांनी लांजेवार आणि भेंडे कुटुंबीयांना दिली.
----
पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
नागपूर - पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज शहरातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या. त्यानुसार नवीन कामठीचे निरीक्षक संतोष भीमराव बाकल यांना सदरचे ठाणेदार म्हणून नियुक्त करण्यात आले. कपिलनगरचे द्वितीय निरीक्षक संजय किसनराव मेंढे यांना नवीन कामठीत ठाणेदार म्हणून नेमण्यात आले. तर, नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक विद्या भीमराव जाधव यांना प्रतापनगरात द्वितीय निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली.
---