हेमा मालिनींच्या पदलालित्यानी नागपूरकरांना जिंकले : खासदार महोत्सवाचा शानदार समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 09:46 AM2018-01-29T09:46:35+5:302018-01-29T09:47:00+5:30

द्रौपदीची अजरामर गाथा प्रसिद्ध अभिनेत्री व निपुण नृत्यांगना हेमा मालिनी यांनी साभिनय सादर केली आणि याच नृत्यनाटिकेने खासदार महोत्सवाचा रविवारी शानदार समारोप झाला.

Hema Malini wins heart of Nagpurians, A glorious conclusion of the MP festival | हेमा मालिनींच्या पदलालित्यानी नागपूरकरांना जिंकले : खासदार महोत्सवाचा शानदार समारोप

हेमा मालिनींच्या पदलालित्यानी नागपूरकरांना जिंकले : खासदार महोत्सवाचा शानदार समारोप

googlenewsNext
ठळक मुद्देद्रौपदीच्या रूपात चमकली समूर्त सौदामिनी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : द्रुपदाच्या पोटी जन्मली म्हणून ती द्रौपदी झाली; पण तिचे खरे नाव कृष्णा. ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले की कृष्णाच्या अतिव प्रेमभक्तीमुळे, हे त्या विधात्यालाच ठाऊक़ परंतु याच सावळ्या रंगामुळे तिच्या सौंदयार्ची स्तुती दूरवर पसरली आणि महाभारतात द्रौपदी स्वयंवराचा अविस्मरणीय अध्याय जोडला गेला. पाच पांडवांशी विवाह झाला आणि द्रौपदीही अहिल्या, सीता, तारा व मंदोदरीच्या पंक्तीतील पंचकन्या ठरली. अशा या पतिव्रता द्रौपदीची अजरामर गाथा प्रसिद्ध अभिनेत्री व निपुण नृत्यांगना हेमा मालिनी यांनी साभिनय सादर केली आणि याच नृत्यनाटिकेने खासदार महोत्सवाचा रविवारी शानदार समारोप झाला. वयाच्या सातव्या दशकाला स्पर्श करतानाही हेमा मालिनी यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. श्वेत वस्त्रावर भरजरी सोनेरी नक्षी ल्याहून रंगमंचावर आलेल्या हेमा मालिनी यांनी दोन तासांच्या या सादरीकरणात नृत्याच्या कोमल अंगांना आपल्या भावमुद्रांनी जिवंत केले. कृष्णासाठी मनात अंकुरणारी प्रेमभावना, कृष्णाने आपला पर्याय म्हणून समोर केलेला धनुर्धारी अर्जुन, कृष्णाला नाकारून अर्जुन स्वीकारताना होणारी मनाची घालमेल, कुंतीच्या तोंडून अनवधानाने निघालेल्या शब्दामुळे लाभलेले पांडवांचे पतीत्व, सर्व राजसत्ता लाथाडून पतींसोबत अरण्याचा रस्ता धरणे, तत्त्वांशी एकनिष्ठ असतानाही भरसभेत होणारे वस्त्रहरण, अशा सर्वच प्रसंगातून हेमा मालिनी यांनी द्रौपदीचे आयुष्य रंगमंचावर उभे केले. हेमा मालिनी यांच्यासोबत कृष्णाची भूमिका साकारणारे राजेश शृंगारपरे यांनीही आपल्या नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, व्हॅल्युएबल ग्रुपचे उपाध्यक्ष नरेंद्र हेटे, दत्ता मेघे, गिरीश गांधी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले.

म्हणून उद्घाटनाला आलो नाही
खासदार महोत्सवाच्या उद्घाटनाला मी येणार होतो. परंतु मंचावर सलमान खान राहील हे कळले आणि मी माझा बेत बदलला. कारण, दोन दबंग एकाच मंचावर येणे शक्य नाही. आता तुम्ही म्हणाल मग नितीन गडकरी कसे आले तर गडकरी हे दबंगांच्या शाळेचे हेडमास्तर आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींचे कौतुक केले व सोबतच हा महोत्सव दरवर्षी घ्यावा, अशी गळही गडकरींना घातली.

दरवर्षी करणार महोत्सवाचे आयोजन
नागपूर शहराच्या भौगोलिक विकासासोबतच सांस्कृतिक विकासही व्हावा, या उद्देशाने मी खासदार महोत्सवाची संकल्पना मांडली. या महोत्सवाला नागपूरकरांचा जो प्रतिसाद लाभला तो मी बघतोय. मी वचन देतो हा महोत्सव आता दरवर्षी होईल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढच्या अनेक खासदार महोत्सवांचा मार्ग प्रशस्त करून टाकला. गडकरी पुढे म्हणाले, आमच्या सामाजिक उपक्रमांतर्गत ८० हजार महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली. यात वेळीच निदान झाल्याने १५०० महिलांचे प्राण वाचवता आले. आता गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी व्हॅन आणणार असून, महिलांनी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असला की आमच्या आरोग्य समन्वयांना कळवावे. त्या ठिकाणी नि:शुल्क आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासनही गडकरींनी दिले.

नागपूरकरांचे आरोग्य सांभाळणार ‘नरनारायण’
खासदार महोत्सवाच्या या समारोपीय कार्यक्रमात व्हॅल्युएबल ग्रुपतर्फे एक कोटी रुपये खर्चून फिरत्या रुग्णालयात परावर्तित केलेल्या व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. व्हॅल्युएबल ग्रुपचे उपाध्यक्ष नरेंद्र हेटे यांनी या व्हॅनची चावी पंडित दीनदयाल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे संचालक वीरल जामदार यांना सोपविली. ‘नरनारायण आरोग्यसेवा’ असे या उपक्रमाचे नामकरण करण्यात आले आहे. या फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन गरजू रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. या अत्याधुनिक व्हॅनमध्ये विविध आजारांच्या तपासण्या, फिजिओथेरपी, रेडिओलॉजीचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नरेंद्र हेटे यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.

Web Title: Hema Malini wins heart of Nagpurians, A glorious conclusion of the MP festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.