मुंबईत संक रॉक ते गेट वे ऑफ इंडिया अंतर हिमानीने अवघ्या ४३ मिनिटे ३८ सेकंदात गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 11:21 AM2020-03-03T11:21:21+5:302020-03-03T11:21:59+5:30
सागरी किनारा नसताना अंबाझरीसारख्या तलावात सराव करून राज्यात सलग नऊ वर्षे अव्वल येण्याचा मान आंतरराष्ट्रीय जलतरणपटू हिमानी फडके हिने पटकावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सागरी किनारा नसताना अंबाझरीसारख्या तलावात सराव करून राज्यात सलग नऊ वर्षे अव्वल येण्याचा मान आंतरराष्ट्रीय जलतरणपटू हिमानी फडके हिने पटकावला आहे. मुंबईत संक रॉक ते गेट वे ऑफ इंडिया असे ५ कि.मी. सागरी अंतर हिमानीने अवघ्या ४३ मिनिटे ३८ सेकंदात गाठून वेगवान जलतरणपटूचाही मान मिळविला. १६ वर्षांच्या हिमानीने वयाच्या आठव्या वर्षांपासून महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटने द्वारा सिंधुदुर्ग आणि मुंबईत होत असलेली ही स्पर्धा प्रत्येकवर्षी जिंकली हे विशेष.
११ व्या वर्गात असलेल्या हिमानीने यंदा ५८ व्या राज्य सागरी जलतरणाच्या १६ ते २५ वर्षे गटात भाग घेतला होता. प्रचंड लाटा उसळत असताना खाऱ्या पाण्याची तमा न बाळगता तिने ४५० स्पर्धकांना मागे टाकले. पुरस्कारादाखल हिमानीला दोन हजार रोख, गौरवचिन्ह, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देण्यात आले. हिमानीचे सहकारी स्मिथ डोरलीकर व प्रणव लोहाळे यांनीदेखील लक्षवेधी कामगिरी केली आहे.
स्मिथ डोरलीकरने ५ किमी अंतर ४३ मिनिटे ३ सेकंदात पार करीत दुसरे स्थान घेतले. शरयू फरतोडेने चौथे स्थान मिळविले.
मूकबधिर जलतरणपटू प्रणव लोहाळे याने २ किमी अंतर १८ मिनिटात पार करीत दुसरे स्थान मिळविले. याच गटांत अक्षय नवले चौथ्या स्थानी राहिला.
१३ वर्षे मुलींमध्ये प्रेरणा चापलेने पाचव्या स्थानावर आली. प्रशिक्षक संजय बाटवे यांच्या मार्गदर्शनात सर्व जलतरणपटू सराव करीत असून ते शार्क अँक्वेटिक स्पोर्टिंग असोसिएशनचे नियमित सदस्य आहेत.