राज्यात तीन ठिकाणी हिमॅटोलॉजी सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 01:36 AM2018-09-15T01:36:19+5:302018-09-15T01:37:33+5:30
रक्ताच्या विकारावरील उपचारासाठी राज्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (मेडिकल), पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हिमॅटोलॉजी सेंटर सुरू होणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करार (एमओयू) नुकताच झाल्याची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी शुक्रवारी नागपुरात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रक्ताच्या विकारावरील उपचारासाठी राज्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (मेडिकल), पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हिमॅटोलॉजी सेंटर सुरू होणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करार (एमओयू) नुकताच झाल्याची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी शुक्रवारी नागपुरात केली.
संजय देशमुख यांनी सांगितले, या सेंटरला घेऊन हिमॅटोलॉजिस्ट डॉ. सविता रंगराजन नागपुरात आल्या आहेत. डॉ. रंगराजन या तीनही मेडिकलमध्ये सेंटरसाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी व मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहे. या सेंटरविषयी अधिक माहिती देताना डॉ. रंगराजन म्हणाल्या, या सेंटरला घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाशी सामंजस्य करार झालेला आहे. या सेंटरमध्ये हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकलसेलसाठी डे-केअर सेंटरची सोय असणार आहे. शिक्षण, संशोधन, माहिती संकलन व ‘क्लिनिकल ट्रायल’ हे या सेंटरचे मुख्य उद्देश असेल. या सेंटरसाठी लागणारा निधी हा राज्य सरकारसोबतच ‘कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सीब्लिटी’ (सीएसआर) फंडामधून गोळा केला जाईल. नागपूरमध्ये हे सेंटर सुरू झाल्यास याचा फायदा मध्यभारतातील रुग्णांना होईल. विशेषत: विदर्भातील सिकलसेलबाधित रुग्णांना या सेंटरमधून मोठी मदत मिळेल, असेही त्या म्हणाल्या.
शासकीय रुग्णालयांमध्ये अनेक आजारांवर अद्यावत उपचार होत असताना रक्ताच्या विकारावर उपचार होत नसल्याचे वास्तव आहे. रुग्णांना पुणे, मुंबई किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागायचे. परंतु आता ‘हिमॅटोलॉजी’ सेंटर सुरू होणार असल्याने याचा सर्वाधिक फायदा गरीब रुग्णांना होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञाच्या मते, हे सेंटर हिमोफिलियाच्या रुग्णांसाठी आशेचे किरण ठरेल. या आजाराच्या रुग्णांच्या शरीरात रक्ताची गुठळी (क्लॉटिंग) तयार होत नाही. यामुळे जखम झाल्यानंतर तेथून सातत्याने रक्तस्राव होत राहतो. उपचार करूनही हा रक्तस्राव थांबत नाही. अखेर शरीरातील रक्ताचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याने त्या रुग्णाचा मृत्यू ओढावतो. जगभरात आज जे काही मोजके आजार आहेत ज्यावर उपचार सापडलेला नाही त्यात हिमोफिलियाचा समावेश होतो. या आजारावर या सेंटरमध्ये संशोधन होऊन औषधोपचार होणार असल्याने रुग्णांना अमरावती किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही.