९९ टक्के रुग्णांमधील मूळव्याध परतून येत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 07:00 AM2022-06-21T07:00:00+5:302022-06-21T07:00:07+5:30
Nagpur News लेझर शस्त्रक्रिया झालेल्या २५० रुग्णांचा अभ्यास नागपुरातील एका पाइल्स सर्जनने केला असता ९९ टक्के रुग्णांमधील मूळव्याध परतून आला नसल्याचे दिसून आले.
नागपूर : कोरोनाचा पहिल्या लाटेत जवळपास १५ टक्के तर, दुसऱ्या लाटेत ३५ टक्क्यांनी मूळव्याधीच्या रुग्णांत वाढ झाली. यातील लेझर शस्त्रक्रिया झालेल्या २५० रुग्णांचा अभ्यास नागपुरातील एका पाइल्स सर्जनने केला असता ९९ टक्के रुग्णांमधील मूळव्याध परतून आला नसल्याचे दिसून आले. हा शोधनिबंध नुकताच ‘इराणी जर्नल ऑफ कोलोरेक्टल रिसर्च’मध्ये प्रकाशित झाला. आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नलमध्ये भारतातून मूळव्याधीवर प्रकाशित झालेले हे पहिलेच प्रकाशन असल्याचे बोलले जात आहे.
असोसिएशन ऑफ सर्जन इंडिया (एएसआय) नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष व कोलोरेक्टल सर्जन डॉ. नीलेश जुननकर यांनी हा शोधनिबंध सादर केला. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, मूळव्याधीवर लेझर उपचार प्रणाली नवीन नाही. परंतु यात ‘लेझर हेमोरायडोप्लास्टी’ ही नवीन प्रक्रिया अधिक फायदेशीर ठरत असल्याचे अभ्यासातून दिसून आले.
-अभ्यासात ११६ महिला व १३४ पुरुषांचा समावेश
डॉ. जुननकर म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत विविध कारणांमुळे मूळव्याधीच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यातील १६ ते ८५ वयोगटातील ११६ महिला व १३४ पुरुषांवर अभ्यास केला. त्यांच्यावर ‘लेझर हेमोरायडोप्लास्टी’ उपचार करून एक वर्षाहून अधिक काळ त्याचा पाठपुरावा केला. त्यात १०० टक्के रुग्णांना शौचापूर्वीच्या आणि नंतरच्या वेदनांपासून सुटका झाली. ११.२ टक्के लोकांमध्ये शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव, इन्फेक्शन, फिस्टुला व फिशर यांसारख्या गुंतागुंत दिसून आल्या. तर ०.८ टक्के म्हणजे एका रुग्णाला पुन्हा मूळव्याध दिसून आला.
-काय आहे ‘हेमोरायॉइडल’उपचार पद्धती
डॉ. जुननकर म्हणाले, लेसरद्वारे पाइल्सला होणारा रक्तपुरवठा बंद केला जातो. यामुळे १५ ते २० दिवसांत पाइल्स आकुंचन पावतात. साधारण अर्ध्या तासाच्या या उपचार पद्धतीत कोणत्याही वेदना होत नाहीत.
-बद्धकोष्ठता व मसालेदार पदार्थांमुळे होतो मूळव्याध
मूळव्याधीचे रुग्ण वाढण्यामागे तिखट व मसालेदार पदार्थांचे अतिसेवन हे एक मुख्य कारण आहे. याशिवाय, बद्धकोष्ठता व अनुवांशिकपणा हेही एक कारण ठरते. या आजाराला दूर ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. रोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे, जेवणाच्या वेळा पाळणे, शतपावली करणे, सकाळी उठल्यावर नियमितपणे शौचास जाणे आदी उपायांची मदत होते, असेही डॉ. जुननकर म्हणाले.