मेयोमध्ये मिळाल्या मिळाल्या गांजाच्या पुड्या, दारूच्या बॉटल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 09:43 PM2019-09-26T21:43:58+5:302019-09-26T21:46:13+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) महाराष्ट्र सुरक्षा बलच्या (एमएसएफ) जवानांनी गुरुवारी अचानक रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी केली. यावेळी चक्क गांजा पुड्या, देशी दारूच्या बॉटल्स, १५० वर गुटखाच्या पुड्या, बीडी व सिगारेटचे पॅकेट्स आढळून आल्याने खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) महाराष्ट्र सुरक्षा बलच्या (एमएसएफ) जवानांनी गुरुवारी अचानक रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी केली. यावेळी चक्क गांजा पुड्या, देशी दारूच्या बॉटल्स, १५० वर गुटखाच्या पुड्या, बीडी व सिगारेटचे पॅकेट्स आढळून आल्याने खळबळ उडाली. नातेवाईक रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी येतात, की व्यसन करण्यासाठी येतात, असा प्रश्न या कारवाईतून उपस्थित केला जात आहे.
मेयो रुग्णालयाचा परिसर मोठा आहे. शिवाय, इमारतही विखुरल्या आहेत. याचा फायदा समाजविघातक घेतात. रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांची लुबाडणूकीचे प्रमाणही मोठे आहे. मेयोच्या ‘एमएसएफ’च्या जवानांमुळे यावर काही प्रमाणात वचक बसला आहे. याचा फायदा होतानाही दिसून येत आहे. यातच एक पाऊल पुढे टाकत, २६ सप्टेंबररोजी ‘एमएसएफ’चे वरीष्ठ सुरक्षा निरीक्षक रमेश तायडे यांच्या नेतृत्वात सर्जिकल कॉम्प्लेक्सयेथे दुपारी अचानक रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी करण्यात आली. यात एकाकडून गांजाची पुडी आढळून आली. चौघांकडून देशी दारुच्या बॉटल्स मिळाल्या. १५० गुटखाच्या पुड्या, सिगारेट व बिडीचे पॅकेट्सही आढळून आले. या सर्व नातेवाईकांना समज देऊन सोडण्यात आले. ही कारवाई भोईरे, कोपले, ओमप्रकाश, विकास, निर्मला महाजन, इंगळे व दरोटे यांनी केली. ‘लोकमत’शी बोलताना तायडे म्हणाले, रुग्णांच्या सुरक्षितेसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही तपासणी रुग्णालयाच्या परिसरात कधीही व कुठेही होईल. यानंतर अमली पदार्थ बाळगणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना पोलिसांच्या हवाली केले जाईल.
रुग्णालयाच्या पानठेल्यांचे अतिक्रमण
रुग्णालयाच्या आत पानठेल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना सहज गुटखा पुड्यांपासून ते बिड्यापर्यंतचे साहित्य उपलब्ध होते. विशेष म्हणजे, डॉ. प्रकाश वाकोडे अधिष्ठाता असताना त्यांनी मनपाच्यामदतीने अतिक्रमण हटविले होते. त्यांनंतर अतिक्रमणाची कारवाईच झाली नसल्याचे बोलले जाते.
धक्कादायक प्रकार
रुग्णांची सश्रृषा करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून अमली पदार्थ मिळणे हा धक्कादायक प्रकार आहे. रुग्णांच्या सुरक्षितेसाठी आता या पुढे ही तपासणी मोहीम वारंवार राबविली जाईल. ‘एमएसएफ’च्या जवानांनी चांगले काम केले आहे.
डॉ. सागर पांडे
वैद्यकीय उपअधिक्षक, मेयो