हेपेटायटिस एचआयव्हीपेक्षा भयंकर
By Admin | Published: July 28, 2014 01:31 AM2014-07-28T01:31:28+5:302014-07-28T01:31:28+5:30
भारतात ‘हेपेटायटिस बी’ने चार कोटी जणांना ग्रासले आहे. याचा धोका एचआयव्हीहून अधिक आहे. सध्या देशात एचआयव्हीबाधित २५ लाख रुग्ण आहे. याच्या तुलनेत हेपेटायटिस बीच्या
‘हेपेटायटिस बी’चे चार कोटीवर रुग्ण : एचआयव्हीच्या १०० पटीने संक्रमित होतात विषाणू
नागपूर : भारतात ‘हेपेटायटिस बी’ने चार कोटी जणांना ग्रासले आहे. याचा धोका एचआयव्हीहून अधिक आहे. सध्या देशात एचआयव्हीबाधित २५ लाख रुग्ण आहे. याच्या तुलनेत हेपेटायटिस बीच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे हेपेटायटिस बीचे विषाणू एचआयव्हीच्या १०० पटीने अधिक प्रमाणात संक्रमित होतात. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास लिव्हर कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. एकट्या नागपुरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात वर्षाकाठी साधारण ५०० वर रुग्ण उपचारासाठी येतात, अशी माहिती प्रसिद्ध सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजीस्ट डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिली.
जगभरात सोमवारी ‘हेपेटायटिस डे’ साजरा होत आहे. त्या निमित्ताने ते ‘लोकमत’शी बोलत होते.
डॉ. गुप्ता म्हणाले, ‘हेपेटायिटस बी’ आणि ‘सी’ची आता कुठे चर्चा होऊ लागली आहे. या दोन्ही आजाराची व्यापक प्रमाणात जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. सावधगिरी बाळगल्यास या दोन्ही आजाराला दूर ठेवणे शक्य आहे. जगातील प्रत्येकी तीन पैकी एका व्यक्तीला हेपेटायटिस बीची कधी ना कधी लागण होते. हेपेटायटिस बीमध्ये रुग्णाला ४५ ते १६५ दिवस ताप, उलटी आणि कमी भूक लागणे यासारख्या आजारांनी ग्रासले जाते. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण सर्वात जास्त दिसून येते. हेपेटायटिस बी हा एक डीएनए व्हायरसचा संक्रमणाचा आजार आहे. जो एक-दुसऱ्याच्या शारीरिक संबंधातून आणि रक्तातून पसरतो. देशात अशा रुग्णांची संख्या चार कोटींपेक्षा जास्त आहे. यामुळेच हेपेटायटिस बी हे मृत्यूचे तिसरे मुख्य कारण ठरत आहे. (प्रतिनिधी)