‘सुपर’च्या डॉक्टरांनी बहाल केले तिचे ‘स्त्रीत्व’; जन्मत:च योनीचा मार्ग नसल्याचे वयाच्या १९ व्या वर्षी कळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2021 07:00 AM2021-12-24T07:00:00+5:302021-12-24T07:00:11+5:30
Nagpur News साडेचार हजार बालिकांमधील एका बालिकेला जन्मत:च स्त्रीत्व नसते. अशा एका युवतीला नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अत्यंत किचकट व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करीत तिचे स्त्रीत्व तिला बहाल केले.
सुमेध वाघमारे
नागपूर : स्त्रीत्व ही निसर्गाने दिलेली देणगी असून वंश पुढे नेण्याची दिलेली ती शक्ती आहे. परंतु साडेचार हजार बालिकांमधील एका बालिकेला जन्मत:च स्त्रीत्व नसते. याला वैद्यकीय भाषेत ‘मेयर-रोकीटान्स्की-कुस्टर-हौसर सिंड्रोम’ म्हणतात. याने पीडित असलेली एक युवती नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोठ्या आशेने आली. येथील युरोलॉजी विभागातील डॉक्टरांनी तिला आधार दिला. अत्यंत किचकट व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करीत तिचे स्त्रीत्व तिला बहाल केले.
मुलगी साधारण वयात आली की, तिला मासिक पाळी येते. परंतु वर्धा येथील १९ वर्षीय युवतीला पाळी आलीच नाही. औषधोपचारानंतरही समस्या कायम होती. अखेर त्यांनी नागपूर गाठले. एका खासगी डॉक्टरांनी तपासल्यावर योनीचा मार्गच नसल्याचे सांगून एका मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सुचविले. लाखो रुपयांचा खर्च येणार होता. गरीब कुटुंब असलेल्या त्या युवतीच्या पालकांना मुलीच्या भविष्याची चिंता पडली. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी मेडिकल गाठले. तेथून त्यांना मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागात पाठविण्यात आले. विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय सेलुकर यांनी त्या मुलीच्या वैद्यकीय तपासण्या केल्या. पालकांना विश्वासात घेऊन शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
‘मेयर-रोकीटान्स्की-कुस्टर-हौसर सिंड्रोम’
डॉ. सेलुकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘मेयर-रोकीटान्स्की-कुस्टर-हौसर सिंड्रोम’चे दोन प्रकार आहेत. एकामध्ये योनी किंवा पाळीची जागा व गर्भाशय तयार झालेले नसते तर, दुसऱ्या प्रकारामध्ये पाळीची जागा, गर्भाशय, मूत्रपिंड व स्पाईन तयार झालेले नसते. या मुलीमध्ये पहिल्या प्रकारचा सिंड्रोम होता. याची माहिती तिच्या पालकांना दिली. गर्भाशय प्रत्यारोपण करणे किंवा पाळी पुन्हा आणणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. परंतु कृत्रिम योनी मार्ग तयार करता येईल याची माहिती दिली. पालकांकडून होकार येताच शस्त्रक्रियेची तयारी केली.
छोट्या आतडीपासून तयार केली ‘ट्यूब’
शरीरातील जठराला जोडून मोठी व नंतर छोटी आतडी जोडलेली असते. छोट्या आतडीचा १० ते १२ सेंटीमीटरचा भाग वेगळा करून त्याला ‘ट्यूब’ म्हणजे कृत्रिम योनी तयार करण्यासाठी काढला. त्याचे व्यवस्थित प्रत्यारोपण केले. ही एक किचकट प्रोसिजर असली तरी डॉक्टरांच्या चमूने ती यशस्वी केली. ही शस्त्रक्रिया मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या पुढाकारात डॉ. धनंजय सेलुकर यांच्या मार्गदर्शनात डॉ. निलेश नागदेवे यांच्या सहकार्याने डॉ. अजित पटेल व डॉ. महेश बोरीकर यांनी यशस्वी केली.
‘मेयर-रोकीटान्स्की-कुस्टर-हौसर सिंड्रोम’ ही जन्मत: असलेली अतिदुर्मिळ विकृती आहे. मुलगी वयात आल्यावरच याचे निदान होते. अनेक गरीब कुटुंब माहिती व पैशांअभावी रुग्णालयापर्यंत पोहचत नाही. अशा मुलींना अनेक त्रासाला पुढे सामोरे जावे लागते. वर्ध्याच्या या १९ वर्षीय युवतीवर केलेली ही शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असावी.
-डॉ. धनंजय सेलुकर, प्रमुख, युरोलॉजी विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल