इथे तुझ्या डोळ्यात पाणी, तिथे मुरारी भिजला!

By admin | Published: August 4, 2014 12:53 AM2014-08-04T00:53:58+5:302014-08-04T00:53:58+5:30

राधे तुझ्या दृष्टीतून का गं, घन सावळा हसला इथे तुझ्या डोळ्यात पाणी, तिथे मुरारी भिजला! हे शब्द होते संदीप खरेंचे आणि निमित्त मैत्रीदिनाचे. जागतिक मैत्रीदिनाच्या पूर्वसंध्येला विदर्भ

Here, water in your eyes, Murari washed there! | इथे तुझ्या डोळ्यात पाणी, तिथे मुरारी भिजला!

इथे तुझ्या डोळ्यात पाणी, तिथे मुरारी भिजला!

Next

वि. सा. संघ : मैत्री काव्याची मैफिल रंगली
नागपूर : राधे तुझ्या दृष्टीतून का गं, घन सावळा हसला
इथे तुझ्या डोळ्यात पाणी, तिथे मुरारी भिजला! हे शब्द होते संदीप खरेंचे आणि निमित्त मैत्रीदिनाचे. जागतिक मैत्रीदिनाच्या पूर्वसंध्येला विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात आधार व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कविसंमेलनात मनाला स्पर्शणाऱ्या कवितांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली. वि. सा. संघातर्फे दरवर्षी मैत्रीदिनाच्या निमित्ताने खास काव्यसंध्या आयोजित केली जाते. यंदाही तसेच आयोजन करण्यात आले होते. या कविसंमेनलात निमंत्रित कवी म्हणून कवयित्री नीरजा, संदीप खरे, गुरू ठाकूर व प्रशांत असनारे सहभागी झाले होते. या सर्वांच्या कवितेतून मैत्रीचा हळवा ऋणानुबंध व्यक्त झाला.
विदर्भातील अकोल्याचे असलेले प्रशांत असनारे यांनी आपल्या कवितेत पावसाच्या लहरीपणाकडे लक्ष वेधले. ‘‘माझी मुलगी पावसाचे चित्र काढते आणि चित्रात रंग भरताना मला विचारते...बाबा, पावसात कोणता रंग भरू? मी तरी तिला पावसाचा कोणता रंग सांगू?’’ असा अस्वस्थ करणारा प्रश्न त्यांनी कवितेतून उपस्थित केला.
आधी गीतकार म्हणून नाव कमावणाऱ्या व नंतर कवितेकडे वळलेल्या गुरू ठाकूर याने एक सुंदर गजल सादर केली.
‘‘नशिबास कर हवे तेवढे वार म्हणालो, राखेतूनही उठलो अन् एल्गार म्हणालो’’ ही त्याची गजल श्रोत्यांना अंतर्मुख करून गेली.
कवयित्री नीरजा यांनी त्यांच्या लिखाणानाचा पिंड जसा आहे त्यानुसारच कविता सादर केली. नात्यांचे बदलते संदर्भ विशद करताना त्या कवितेतून म्हणाल्या, ‘‘हल्ली याच्या रक्ताला कुबट वास यायला लागला आहे...एकदा धुतले पाहिजे केस चांगल्या शाम्पूने’’ शेवटी संदीप खरे यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करून श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात नेले. ‘‘स्पायडरमॅनची बायको म्हणाली, आमचे हे भलते चिकट....पण चिकट नुसते भिंतीपुरते काम करतात सगळी फुकट’’ या त्यांच्या स्पायडरमॅनची बायको कवितेला श्रोत्यांची जोरदार दाद मिळाली.
कार्यक्रमाचे बहारदार संचालन शुभदा फडणवीस यांनी केले.(प्रतिनिधी)

Web Title: Here, water in your eyes, Murari washed there!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.