येथे ‘स्त्री’ला दररोज करावा लागतो ‘देसी मी टू’चा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:38 PM2018-10-23T23:38:03+5:302018-10-23T23:48:16+5:30

फायनल इयरची ऋचिता, कॉलेजला येण्यासाठी दररोज बसने प्रवास करावा लागतो. बसमध्ये अनेकदा कुणी गर्दीचा फायदा घेत शरीराशी लगट करण्याचा, स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. तरुणही आणि म्हातारेही. १७ वर्षांची पायल सांगते, तिच्या सडपातळ बांध्यावर मुलांकडून टिंगल केली जाते, भाजीबाजारातील वस्तूंची नावे घेऊन शरीरावर किळसवाणे कमेंट केले जातात. लठ्ठपणामुळे कायम थट्टेचा विषय ठरणाऱ्या अंकिताने कॉलेज, बस आणि मंदिरातीलही किळसवाणे अनुभव कथन केले. नात्यातील माणसानेच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा अनुभव सांगणारी १५ वर्षांची अमरीन आणि पहिल्याच वर्गात असताना असला घृणास्पद प्रकार सहन करणारी स्नेहल. अशा अनेक तरुणींना दररोज या अनुभवांचा सामना करावा लागतो. बोलायला गेल्या की आसपासचे लोक त्यांनाच दोषी ठरवतात व कुटुंबातील लोक त्यांना गप्प बसवतात. म्हणूनच भीतीपोटी त्या बोलत नाही. हे आहे समाजातील ‘देसी मी टू’चे वास्तव. आज संधी मिळाली आणि हिंमत करून या सर्वांनी आपले अनुभव कथन केले तेव्हा सभागृहात असलेला प्रत्येक व्यक्ती स्तब्ध राहिला.

Here 'woman' is required to face 'Desi Me Too' daily | येथे ‘स्त्री’ला दररोज करावा लागतो ‘देसी मी टू’चा सामना

येथे ‘स्त्री’ला दररोज करावा लागतो ‘देसी मी टू’चा सामना

googlenewsNext
ठळक मुद्देतरुणींच्या अनुभव कथनाने सभागृह स्तब्धकुटुंब, समाज, व्यवस्थेकडून साथ मिळत नसल्याची खंत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फायनल इयरची ऋचिता, कॉलेजला येण्यासाठी दररोज बसने प्रवास करावा लागतो. बसमध्ये अनेकदा कुणी गर्दीचा फायदा घेत शरीराशी लगट करण्याचा, स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. तरुणही आणि म्हातारेही. १७ वर्षांची पायल सांगते, तिच्या सडपातळ बांध्यावर मुलांकडून टिंगल केली जाते, भाजीबाजारातील वस्तूंची नावे घेऊन शरीरावर किळसवाणे कमेंट केले जातात. लठ्ठपणामुळे कायम थट्टेचा विषय ठरणाऱ्या अंकिताने कॉलेज, बस आणि मंदिरातीलही किळसवाणे अनुभव कथन केले. नात्यातील माणसानेच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा अनुभव सांगणारी १५ वर्षांची अमरीन आणि पहिल्याच वर्गात असताना असला घृणास्पद प्रकार सहन करणारी स्नेहल. अशा अनेक तरुणींना दररोज या अनुभवांचा सामना करावा लागतो. बोलायला गेल्या की आसपासचे लोक त्यांनाच दोषी ठरवतात व कुटुंबातील लोक त्यांना गप्प बसवतात. म्हणूनच भीतीपोटी त्या बोलत नाही. हे आहे समाजातील ‘देसी मी टू’चे वास्तव. आज संधी मिळाली आणि हिंमत करून या सर्वांनी आपले अनुभव कथन केले तेव्हा सभागृहात असलेला प्रत्येक व्यक्ती स्तब्ध राहिला.
बॉलिवूडची अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या आरोपानंतर ‘मी टू’ या मोहिमेने देशभरात वादळ उठविले. ती बोलली आणि मागोमाग फिल्म, राजकीय अशा क्षेत्रातील महिलांनी आवाज उचलला. यामध्ये ग्लॅमर असल्याने कदाचित त्या माध्यमांच्या प्रकाशझोतात आल्या असतील. हे सर्व उच्चभ्रू वर्गामध्ये चालतेच, असे म्हणून व उथळ संबोधून याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. कारण शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या, नोकरी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या, मजुरी करणाऱ्या, बसने प्रवास करणाऱ्या सामान्य महिला, मुलींना दररोज अशा घृणास्पद प्रसंगांना सामोरे जावे लागते. भारतातील या सामान्य महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रश्नांना वाचा फुटावी, या उद्देशाने युवक क्रांती दल आणि सी.पी. अ‍ॅन्ड बेरार महाविद्यालयाच्या महिला सेलच्यावतीने लैंगिक अत्याचाराचा जाहीर पंचनामा करणाऱ्या ‘देसी मी टू’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी धनवटे सभागृह, शंकरनगर चौक येथे करण्यात आले. डॉ. मिलिंद बाराहाते यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमात डॉ. रश्मी पारसकर-सोवनी, रुबीना पटेल, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वाती धर्माधिकारी व युक्रांदचे संदीप बर्वे वक्ता म्हणून उपस्थित होते.
यावेळी सर्वांचे लक्ष वेधले ते या खुल्या व्यासपीठावर न भीता आपले मनोगत व्यक्त करायला आलेल्या तरुणी व महिलांनी. चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आजोबाच्या वयातील नराधमाला कारागृहापर्यंत पाठविण्यासाठी लढा देणाऱ्या योगिता यांनी आपला अनुभव मांडला. इतर तरुणांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. हे प्रकार महिलांनी कधीपर्यंत सहन करावे, त्यांना वस्तू म्हणून का पाहिले जाते, त्यांचा आवाज का दाबला जातो, मुलींवरच बंधने का घातली जातात, त्यांच्या पाठीमागे कुटुंब, हा समाज का उभा राहत नाही, घडणारा प्रसंग मूग गिळून पाहण्यापेक्षा समोर येऊन त्यांचे सहकार्य का केले जात नाही, घरातून बाहेर पडताना, रात्री-बेरात्री फिरताना सुरक्षित आणि मोकळा श्वास कधी घेतील, असे अस्वस्थ करणारे असंख्य प्रश्न उपस्थित करून समाजाला अंतर्मुख केले.
यावेळी बोलताना डॉ. मिलिंद बाराहाते यांनी, हे सर्व वास्तव संवेदनशील आणि अस्वस्थ करणारे असल्याची भावना व्यक्त केली. अत्याचाराच्या प्रसंगाविरोधात आवाज उठविण्याचा निश्चय पुरुषांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. रुबीना पटेल म्हणाल्या, लैंगिक हिंसा, शोषणाला वय नसते. सर्वच वयातील महिलांना कुठेही असे प्रसंग सहन करावे लागतात. समाजाने आपली मानसिकता बदलावी, तिच्या गुणांची व स्वप्नांची कदर झाली पाहिजे. स्त्रियांना सत्ता नको, बरोबरीचा अधिकार मिळावा, ही भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी स्वत:चे काटा उभा करणारे प्रसंग वर्णन केले. तनुश्री आताच का बोलली, या प्रश्नाचे उत्तर देताना, यात पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेचे वास्तव असल्याचे सांगत, ‘आता का नाही?’ हा प्रतिप्रश्न केला. महिलांनी आता गप्प राहू नये, सक्षम व्हावे, बोलके व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आयोजक डॉ. रश्मी पारसकर-सोवनी यांनी भूमिका मांडली. सामान्य महिलांच्या प्रश्नांना, अत्याचाराला स्थान मिळत नाही. ‘मी टू’ला उथळ, पेज थ्री व आंबट शौकिनांचा विषय म्हणून दुर्लक्ष करण्यापेक्षा यानिमित्ताने या देशातील सामान्य महिलांचे गंभीर प्रश्न उचलणे महत्त्वाचे आहे. सर्व क्षेत्रात महिलांना हीन वागणूक, दुय्यम दर्जा, अपमान, टोमणे, नकोसे स्पर्श, आर्थिक व लैंगिक शोषणाचे बळी ठरावे लागते. मी टूच्या निमित्ताने सडक्या, कुजक्या मानसिकतेवर घाव घालता यावा. देशतील कोट्यवधी महिलांची चळवळ व्हावी, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन रश्मी मदनकर यांनी केले.

महिलांच्या ‘त्या’ कपड्यांचे बोलके प्रदर्शन
अनेकदा अत्याचारांच्या घटनांसाठी मुलींनाच दोषी ठरवून त्यांच्या कपड्यांवर आक्षेप घेतला जातो. या घृणास्पद आक्षेपाला कपड्यांच्या प्रदर्शनातून उत्तर देण्यात आले. यात शाळेचा युनिफॉर्म, फ्रॉक, सलावर, जीन्स-टी-शर्ट, बुरखा, साडी आदी वस्त्र दर्शविण्यात आले. या कपड्यांसह घडलेल्या प्रसंगाचे वर्णनही व्यक्त करण्यात आले होते. हे कपडे कुठल्याच अंगाने उत्तान नाहीत, पण तरीही पुरुषी नजर त्या मुलींकडे का जाते, असा भेदक सवाल या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपस्थित केला गेला.

Web Title: Here 'woman' is required to face 'Desi Me Too' daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.