येथे मिळतो मोकळा श्वास, गावातील घाण हद्दपार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:08 AM2021-05-26T04:08:17+5:302021-05-26T04:08:17+5:30

शिरीष खोबे नरखेड : ऑक्सिजनअभावी देशभरात अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने शेकडो लोकांना कोरोनाची बाधा झाली. ...

Here you can breathe freely, get rid of the dirt in the village! | येथे मिळतो मोकळा श्वास, गावातील घाण हद्दपार!

येथे मिळतो मोकळा श्वास, गावातील घाण हद्दपार!

Next

शिरीष खोबे

नरखेड : ऑक्सिजनअभावी देशभरात अनेक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. रोगप्रतिकारक क्षमता कमी असल्याने शेकडो लोकांना कोरोनाची बाधा झाली. मात्र नागपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या येनीकोणी (ता. नरखेड) या गावाने कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. ते यशस्वीही झाले. मात्र गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी या गावात तब्बल सात वर्षांपासून ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत. आज या गावात सार्वजनिक जागेवर लावण्यात आलेल्या झाडांना ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. एकेकाळी दारूच्या अड्ड्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या गावात आज सर्वत्र मोकळा श्वास घेता येतो. गावातील घाणही हद्दपार झाली आहे.

जेमतेम १५०० लोकसंख्या असलेल्या या गावात सात वर्षांपूर्वी समस्यांचा डोंगर उभा होता. भौतिक सुविधांचा अभाव होता. गावठी दारूचे अड्डे, सट्टा आणि जुगाराचेही गुत्थे चालायचे. जिकडे-तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले होते. गावातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रोगराईने डोके वर काढले होते. परंतु या गावाचा आमूलाग्र बदल झाला तो २०१४ नंतर. यासाठी ग्रामपंचायतने रहिवाशांना भौतिक सुविधा पुरविण्याचा विडाच उचलला. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता शुद्ध पिण्याचे पाणी, बंदिस्त गटारे, सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामस्वच्छता, रिकाम्या जागेवर परसबाग, गावात पक्के रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड. प्रत्येक झाडाला पाणी मिळावे व पाण्याची बचत व्हावी याकरिता ड्रीप इरिगेशनचा उपयोग केला. त्यामुळे आज हे गाव पूर्णपणे बदलले आहे.

घरकुलासाठी भूमिहीनांना जमीन पट्ट्याचे वाटप करण्यात आले. गावाच्या मध्य भागातून वाहणाऱ्या नाल्यावर कोल्हापुरी बंधारे, नाल्याचे सुशोभिकरण, शेतकऱ्यांसाठी शेततलाव, पाणलोट, रेन वाॅटर हार्वेस्टिंग व्यवस्थापन, गाव हागणदारीमुक्त, रोगराईमुक्त राहण्यासाठी शौचालय बांधकाम करण्यात आले. कचरा संकलनाद्वारे त्यापासून कम्पोस्ट खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प गावात राबविण्यात आला. सुसज्ज रुग्णालय, लहान मुलांचे नियमित लसीकरण, ग्रामपंचायत कार्यालयाची प्रशस्त इमारत, सामाजिक कार्यासाठी सभामंडप, स्मार्ट शाळा व अंगणवाडी, शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता आरओचे पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वयंपाकगृह, पथदिवे, स्मशानभूमी, चांगले पांदण रस्ते, आधुनिक क्रीडांगण, खुल्या व्यायामशाळेची निर्मिती करण्यात आली. अर्थात ग्रामस्थांच्या संकल्पामुळेच हे शक्यही झाले. या गावातील प्रत्येक चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. यासोबतच महिला व युवतींच्या सबलीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.

राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने गौरव

येनीकोणी ग्रामपंचायतने तालुक्यापासून देशाच्या विशिष्ट पुरस्काराच्या यादीत स्वत:च्या नावाची नोंद करून घेतली. जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार, आदर्शग्राम तंटामुक्त पुरस्कार, जिल्हा पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघ, पंचायत समितीचे विविध पुरस्कार, सरपंच सेवा संघाचा पुरस्कार, महाराष्ट्र सरपंच संघटनेचा पुरस्कारही पटकाविला आहे. आता केंद्र सरकारचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार पटकावून या गावाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

--

कोणतेही विकासात्मक कार्य करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच ग्रामस्थांना संपूर्ण कामातच सहभागी करून घेत असतो. ग्रामस्थही माझं गाव म्हणून सर्वच प्रकारे मदत करीत असतात. त्यामुळेच येनीकोणीचा आज लूक बदलला आहे.

- उषा मनीष फुके,

सरपंच, येनीकोणी

Web Title: Here you can breathe freely, get rid of the dirt in the village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.