प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हरवला हेरिटेज कस्तुरचंद पार्कचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:00 AM2020-09-10T11:00:39+5:302020-09-10T11:01:05+5:30
कस्तुरचंद पार्क मैदान व मैदानाच्या मध्यभागी असलेले स्मारक अत्यंत वाईट अवस्थेत आहे, असे परखड ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी ओढले.
राकेश घानोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संत्रानगरीच्या हृदयस्थळी असलेल्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानाचा गौरव प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हरवला आहे. प्रशासनाने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्रावर दिलेल्या माहितीच्या उलट परिस्थिती मैदानावर आहे. मैदान व मैदानाच्या मध्यभागी असलेले स्मारक अत्यंत वाईट अवस्थेत आहे, असे परखड ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी ओढले.
या न्यायमूर्तींनी ५ सप्टेंबर रोजी कस्तुरचंद पार्कला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, आढळून आलेली दुरवस्था त्यांनी या प्रकरणावरील आदेशात नोंदवून प्रशासनाची कानउघाडणी केली. महान दानशूर जमीनदार सर दिवान बहादूर सेठ कस्तुरचंद डागा यांनी ही जमीन खेळांकरिता दान केली होती. शहराच्या विकास आराखड्यात ही जमीन हिरव्या रंगात दर्शविण्यात आली आहे. तसेच, या मैदानाला ग्रेड-१ हेरिटेजचा दर्जा देण्यात आला आहे. असे असताना प्रशासनाने मैदानाचा गौरव जपला नाही. त्यामुळे मैदानाची वाईट अवस्था झाली आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.
मैदानाची दुरवस्था पाहून न्यायालयाने एप्रिल-२०१७ पासून वेळोवेळी आवश्यक आदेश दिले. परंतु, प्रशासनाने आदेशांची गांभीर्याने अंमलबजावणी केली नाही. विविध विकास कामांमुळे मैदानावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. संपूर्ण मैदान ओबडधोबड झाले आहे. मैदानावर व्यवस्थित चालता येत नाही. त्यामुळे खेळाचा विचार करता येत नाही. मैदानाचे ९० टक्के समतलीकरण झाल्याचा दावा महानगरपालिकेने केला होता. परंतु, त्यात तथ्य आढळून आले नाही. वॉकिंग, जॉगिंग व सायकल ट्रॅक आणि वृक्षारोपणाचे काम अपूर्ण आहे. मैदानाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. अतिक्रमण व मातीगोट्याचे ढिगारे हटविण्याशिवाय दुसरे कोणतेच ठोस काम झाले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
आदेशातील इतर निरीक्षणे
१ - कस्तुरचंद पार्कचा उपयोग मुंबईतील ओव्हल मैदानासारखा झाला पाहिजे. त्यासाठी कस्तुरचंद पार्कचा गौरव परत आणणे आवश्यक आहे. तसेच, सामान्य नागरिकांना या मैदानावर खेळता आले पाहिजे.
२ - मैदानावरील खोदकामात ऐतिहासिक तोफ आढळून आल्या. परंतु, जनतेला ऐतिहासिक मूल्ये व भव्यता दाखविण्यासाठी त्या तोफ मैदानावर प्रदर्शित करण्यात आल्या नाहीत.
३ - स्वच्छतागृहे, प्रवेशद्वार, ड्रेनेज लाईन इत्यादी कामे अर्धवट आहेत. ४ कोटी ५२ लाख रुपये निधीतून ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा चुकीचा आहे.
४ - मैदानावरील स्मारकाला जागोजागी भेगा पडल्या आहेत. बांधकाम फुटले आहे. खिटक्या तुटल्या आहेत. स्मारकाचे एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही. स्मारक जीर्ण होत आहे.