नागपूरच्या गोंड राजांचा घाट कधी बनणार ‘राजघाट’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:02 AM2018-07-30T11:02:39+5:302018-07-30T11:06:41+5:30
नागपूर नगरीची स्थापना करणारे गोंड राजे बख्तबुलंद शहा आणि या राज घराण्यांत मृत्यू पावलेल्या राजांचे समाधीस्थळ सक्करदरा परिसरात आहे. या समाधीस्थळाला हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु अतिक्रमणामुळे नागपूर नगरीचे हे ऐतिहासिक वैभव हरविण्याच्या मार्गावर आहे.B
मंगेश व्यवहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर नगरीची स्थापना करणारे गोंड राजे बख्तबुलंद शहा आणि या राज घराण्यांत मृत्यू पावलेल्या राजांचे समाधीस्थळ सक्करदरा परिसरात आहे. या समाधीस्थळाला हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु अतिक्रमणामुळे नागपूर नगरीचे हे ऐतिहासिक वैभव हरविण्याच्या मार्गावर आहे. गोंड राजांचा हा घाट ‘राजघाट’ बनावा अशी मागणी आदिवासी समाजातून होत आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा राजघाट दुर्लक्षित पडला आहे. ३० जुलै रोजी गोंड राजा बख्तबुलंद शाह यांची जयंती आहे. याचे औचित्य साधून महापालिकेने यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
गोंड राजे बख्तबुलंद शाह यांनी १६६८ ते १७०६ या कालावधीत ३८ वर्षे राज्य केले. त्यांनी १७०२ मध्ये नागपूर नगरीची स्थापना केली. सक्करदरा येथे गोंड राजांची विशाल स्मशान भूमी होती. राजघराण्यातील लोकांचा मृत्यू झाल्यानंतर या स्मशानभूमीत त्यांना दफविण्यात येत होते. या स्मशानभूमीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. आता फक्त २९ समाधी अस्तित्वात आहे. या समाधीसुद्धा तुटलेल्या अवस्थेत आहे.
जागेची मालकी नगर भूमापन विभागाचे मालमत्ता पत्रकानुसार न.भू. क्र.१७५ वर नागपूर सुधार प्रन्यास च्या नावाची अनधिकृत नोंद आहे. तसेच महानगरपालिकेच्या वारसा (हेरिटेज) यादी क्र.५२ वर ‘गोंड स्मशानभूमी’ असा उल्लेख आहे तसेच ‘शहा परिवार’ यांची मालकी दाखविली आहे. गोंड स्मशान भूमी अतिक्रमणमुक्त करून ‘राजघाट’ चा दर्जा देऊन सौंदर्यीकरण करण्यात यावे व ऐतिहासिक वारसा जपावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांच्याकडे वारंवार करण्यात आली आहे. यासंदर्भात नेहरूनगर झोन स.आयुक्त यांचेसोबत संघटनेची बैठक झाली आहे. त्यांनी महानगर पालिकेला शहा परिवार व नागपूर सुधार प्रन्यास यांनी आपली मालकी सोडून जागा हस्तांतरित केल्यास राजघाटप्रमाणे सौंदर्यीकरण करण्यात येणार असे सांगितले. नागपूर मनपा आयुक्त यांना शहा परिवारचे वीरेंद्र शहा यांनी हस्तांतरण करण्याची संमती दिली, एनआयटीनेसुद्धा संमती दिली आहे. मात्र मनपाच्या स्थावर (इस्टेट) विभागात राजघाटाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव प्रलंबित आहे.
गोंडवानाचा वैभवशाली इतिहास असलेल्या गोंड राजे यांचा राजघाट अतिक्रमण व दुर्लक्षित आहे. त्याचा तात्काळ राजघाटप्रमाणे विकास करून भावी पिढीकरिता वारसा जपावा. हे राजघाट आदिवासींचा ऐतिहासिक वारसा आहे. राजांच्या जयंतीनिमित्त महापालिकेने यासंदर्भात ठोस पाऊल उचलावे.
- दिनेश शेराम, अध्यक्ष,
अखिल भारतीय आदिवासी
विकास परिषद नागपूर विभाग