वारसा जपणारे वारसास्थळ : १५६ वर्षापासून उभी आहे नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयाची वास्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:38 PM2019-06-01T23:38:17+5:302019-06-01T23:39:58+5:30
काही गोष्टी, काही वस्तू आणि काही इमारती-स्थळे ऐतिहासिक वारसा असतात. इतिहासाच्या कुशीत दडलेल्या अशा ऐतिहासिक गोष्टींचे जतन करणारा एक ऐतिहासिक वारसा उपराजधानीला लाभला आहे. हा वारसा म्हणजे मध्यवर्ती संग्रहालय अर्थात अजब बंगला होय. झपाट्याने बदलणाऱ्या या शहराच्या असंख्य जुन्या आठवणी जतन करणाऱ्या ब्रिटिशांनी तयार केलेल्या या वारसाला आज १५० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यामुळेच या संग्रहालयाला ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही गोष्टी, काही वस्तू आणि काही इमारती-स्थळे ऐतिहासिक वारसा असतात. इतिहासाच्या कुशीत दडलेल्या अशा ऐतिहासिक गोष्टींचे जतन करणारा एक ऐतिहासिक वारसा उपराजधानीला लाभला आहे. हा वारसा म्हणजे मध्यवर्ती संग्रहालय अर्थात अजब बंगला होय. झपाट्याने बदलणाऱ्या या शहराच्या असंख्य जुन्या आठवणी जतन करणाऱ्या ब्रिटिशांनी तयार केलेल्या या वारसाला आज १५० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यामुळेच या संग्रहालयाला ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ब्रिटिश काळात, अॅन्टेक्वेरियन सोसायटी ऑफ सेंट्रल प्रोव्हिन्सेस या संस्थेच्या गरजेनुसार नागपूरमध्ये संग्रहालय व ग्रंथालय स्थापन करावे, अशी संकल्पना पुढे आली. यानुसार नागपूरचे तत्कालीन मुख्य आयुक्त सर रिचर्ड टेम्पल यांच्या सूचनेंतर्गत संग्रहालय व ग्रंथालय निर्मितीकरिता समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये मुख्य आयुक्त सर रिचर्ड टेप्मल यांच्याशिवाय फादर रेव्हरंड हिस्लॉप तसेच इतर उच्च पदस्थ इंग्रज अधिकाऱ्यांचा समावेश होता. समितीने १८६२ मध्ये निर्देशित व निश्चित केलेल्या जागेवर संग्रहालयाची इमारत बांधली व ‘सेंट्रल म्युझियम’ङ्कया नावाने १८६३ मध्ये हे संग्रहालय अस्तित्वात आले.
संग्रहालयाच्या स्थापनेपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या काळात नागपूर मध्यवर्ती संग्रहालय ब्रिटिश प्रशासनाच्या विविध विभागांतर्गत कार्यरत होते. यामध्ये पब्लिक इन्स्ट्रक्शन, कृषी उद्योग इत्यादी विभागाचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हे ग्रंथालय मध्य प्रांत सरकारच्या शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली आले. राज्याच्या पुनर्रचनेनंतर १९६२ मध्ये मध्यवर्ती संग्रहालय नागपूर, महाराष्ट्र सरकारकडे वर्ग होऊन, या संग्रहालयाचा कार्यभार पुरातत्त्व व हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स म्हणजेच आजचे पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय विभागाकडे सोपविण्यात आला. सद्यस्थितीत याच विभागाच्या अधिपत्याखाली हे संग्रहालय आहे. ब्रिटिश काळात जी संग्रहालये निर्माण करण्यात आली त्यापैकी नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय हे मध्य भारतातील सर्वात जुने व अग्रणी असून, राज्य शासनाचे सर्वात जुने व मोठे संग्रहालय आहे. १९६४ मध्ये संग्रहालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त देशाचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांनी भेट दिली होती. २०१३ साली या संग्रहालयाला १५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त शतकोत्तर सुवर्ण वर्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
संग्रहालयात अनेक ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतात. विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी उत्खननात सापडलेल्या मूर्ती, भोसले कालीन युद्ध साहित्य, ठिकठिकाणचे नकाशे आहेत. भारताच्या गुप्त, मगध, मौर्य, वाकाटक, सातवाहन अशा वेगवेगळ्या राज्यकाळाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारी वेगवेगळी दालने आहेत. सोबतच यात पुरातत्त्व, पक्षीदालन, कला व उद्योग, चित्रकला, शस्त्रदालनही येथे आहे. अनेकाविध पुरातन वस्तु, शिल्पकला, चित्रकला, अश्मयुगीन हत्यारे, कोरीव वस्तू यासारख्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतो. या संग्रहालयात भूगर्भशास्त्र, सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी, पुरातत्त्व, शस्त्र, नाणे विषयक, नृत्य अशी विविध प्रकारच्या पुरातन संस्कृतीची ओळख करुन देणारी दालने आहेत. तसेच याप्रसंगी संग्रहालयात नागपूर हेरिटेज दालनाची निर्मिती करण्यात आली. आजही हे चिरतरुण संग्रहालय आपले वैभव राखून आहे.