हे साईराम!

By admin | Published: June 24, 2014 01:04 AM2014-06-24T01:04:35+5:302014-06-24T01:04:35+5:30

शिर्डीच्या पवित्र भूमीवरून आपल्या भक्तांना श्रद्धा अन् सबुरीचा संदेश देत माणुसकीची पूजा बांधायला शिकविणारे साईबाबा हे देश-विदेशातील लाखो भाविकांचे दैवत आहेत़ या सर्व साईभक्तांची

Hey Ram! | हे साईराम!

हे साईराम!

Next

शंकराचार्यांच्या विधानामुळे नागपूरकर साईभक्त संतप्त
नागपूर : शिर्डीच्या पवित्र भूमीवरून आपल्या भक्तांना श्रद्धा अन् सबुरीचा संदेश देत माणुसकीची पूजा बांधायला शिकविणारे साईबाबा हे देश-विदेशातील लाखो भाविकांचे दैवत आहेत़ या सर्व साईभक्तांची बाबांवर अपार श्रद्धा आहे़ परंतु द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी साईबाबांच्या देवत्वालाच आव्हान देऊन साईभक्तांचा रोष ओढवून घेतला आहे़ शिर्डीचे साईबाबा हे काही देव नाहीत. त्यामुळे त्यांचं देऊळ बांधणं चुकीचं आहे़ साईबाबा हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक नाहीत, असे विधान शंकराचार्यांनी केल्याने सर्व स्तरातून या विधानाचा निषेध करण्यात येत आहे़ नागपुरातही त्याचे पडसाद उमटत असून, साईभक्तांच्या भावना अतिशय संतप्त आहेत़
कुठलेही कारण नसताना अचानक शंकराचार्यांनी साईबाबांवर अशी आगपाखड का केली, काही कळायला मार्ग नाही़ साईबाबांची शिर्डी हे देश-विदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे़ केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिमांसह विविध धर्मातील भक्त बाबांना मानणारे आहेत़ बाबांवरच्या या अपार श्रद्धेपोटीच राज्यभरातून दरवर्षी शिर्डीला शेकडो पालख्या जात असतात. ‘सबका मालिक एक’ म्हणत बाबांनी आपल्या विविध जाती-पंथ-संप्रदायातील भक्तांना समानतेच्या एका सूत्रात बांधून टाकले आणि म्हणूनच या भक्तांनी त्यांना देवत्व बहाल केले़ देव आणि भक्त हा असा श्रद्धा आणि विश्वासाचा मामला आहे़ ज्याला यावर आक्षेप असेल त्याने तो मानू नये़ पण उगाच वाद उकरून काढण्यासाठी जर कुणी साईबाबांच्या देवत्वाला आव्हान देत असेल तर त्याचा तीव्र निषेध केला जाईल, अशा भावना नागपुरातील साईभक्तांनी व्यक्त केल्या आहेत़
जगभर मंदिर, मग देव कसा नाही?
साईबाबांना मानणारा भक्त हा कोणत्याही जातीधर्माचा असला तरी त्याची बाबांवर श्रद्धा आहे़ या श्रद्धेपोटीच साईबाबांचे जगभर मंदिर बांधण्यात आले आहेत़ देवत्व असे कुणालाही लाभत नाही़ त्यासाठी अखंड साधना लागत असते़ ती साधना बाबांच्या अंगी होती म्हणूनच त्यांना भक्त आपला देव मानतात़ यामुळे शंकराचार्यांच्या पोटात कळ उठण्याचे कारण नाही़ अशा चुकीच्या विधानांमुळेच हिंदू धर्म बदनाम होत आहे़ मंदिराच्या ज्या पैशांवर शंकराचार्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे तो पैसा सोयीसुविधांसाठीच वापरला जातो़ शंकराचार्यांचे हे विधान फारच लाजिरवाणे आहे़
बाबासाहेब उत्तरवार, संस्थापक, साईबाबा मंदिर
लाखो भक्तांच्या श्रद्धेवरच शंका
साईबाबांनी कधीच माझे मंदिर बांधा व मला देव माना असे म्हटले नाही़ भक्तांना सार्इंच्या देवत्वाची जी अनुभूती आली त्यातूनच त्यांचा भक्तवर्ग वाढत गेला व त्यामुळेच लाखो भक्तांचे देव झाले़ आज शंकराचार्यांपेक्षा जास्त भाविक सार्इंच्या दर्शनाला जातात़ याचा अर्थ स्पष्ट आहे की शंकराचार्यांपेक्षा सार्इंना मानणारे लोक जास्त आहेत़ या सर्व भक्तांच्या श्रद्धेवरच शंका घेण्याचा निषेधार्ह प्रकार आहे़
लक्ष्मणराव उपगन्लावार, उपाध्यक्ष, साईबाबा सेवा मंडळ
साईभक्तांना डिवचण्याचा प्रकार
शंकराचार्यांचे हे विधान ऐकून माझे तर डोकेच फिरले आहे़ कोणत्या उद्देशाने त्यांनी असे मत व्यक्त केले हे तपासले गेले पाहिजे़ एका पीठाच्या शंकराचार्यांनी लाखो भाविकांच्या श्रद्धेची अशी जाहीर थट्टा करणे हा तर साईभक्तांना डिवचण्याचाच प्रकार दिसत आहे़
महेश बघेल, साईभक्त

Web Title: Hey Ram!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.