हाय, आय एम सुनिता विलियम्स’! ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांशी थेट साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 08:13 PM2019-02-12T20:13:31+5:302019-02-12T20:16:55+5:30
सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकल्पात व्यस्त असलेल्या ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारची सायंकाळ काहिशी वेगळी होती. संगणक विज्ञान विभागाच्या ‘स्मार्ट क्लासरुम’मध्ये बसलेल्या प्रत्येक जण रोमांचित झाला होता. मनात उत्साह, प्रश्नांची यादी अन् केव्हा तो क्षण येतो याची प्रतीक्षा होती. अखेर सायंकाळी ७ वाजता ‘एलईडी स्क्रीन’वर ती झळकली अन् जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्त्व असूनदेखील अतिशय साधेपणाने ओळख करुन दिली, ‘हाय, आय एम सुनिता विलियम्स’ ! त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सुनितांचे उत्तर हा क्रमच सुरू झाला व विद्यार्थ्यांना अंतराळ विश्वाचे विविध पैलू नव्यानेच उलगडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकल्पात व्यस्त असलेल्या ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारची सायंकाळ काहिशी वेगळी होती. संगणक विज्ञान विभागाच्या ‘स्मार्ट क्लासरुम’मध्ये बसलेल्या प्रत्येक जण रोमांचित झाला होता. मनात उत्साह, प्रश्नांची यादी अन् केव्हा तो क्षण येतो याची प्रतीक्षा होती. अखेर सायंकाळी ७ वाजता ‘एलईडी स्क्रीन’वर ती झळकली अन् जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्त्व असूनदेखील अतिशय साधेपणाने ओळख करुन दिली, ‘हाय, आय एम सुनिता विलियम्स’ ! त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सुनितांचे उत्तर हा क्रमच सुरू झाला व विद्यार्थ्यांना अंतराळ विश्वाचे विविध पैलू नव्यानेच उलगडले.
‘व्हीएनआयटी’च्या ‘अॅक्सिस’ या तांत्रिक उत्सवांतर्गत संगणक विज्ञान विभागातर्फे भारतीय मूळ असलेल्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विलियम्स यांच्याशी थेट संवादासाठी ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात आले होते. सुनिता विलियम्स यांनी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांंना मनमोकळेपणाने अनुभव सांगितले. विविध अंतराळ मोहिमेदरम्यान आलेले अडथळे, त्यातील तांत्रिक मुद्दे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील गाजलेले ‘स्पेस वॉक’, एक महिला असूनदेखील अंतराळात घालविलेला इतका कालावधी व त्यातून निर्माण झालेले ‘रेकॉर्ड’ इत्यादींवर त्यांनी भाष्य केले. सोबतच अंतराळ विज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग, महिला सक्षमीकरण या मुद्यांवरदेखील त्यांनी आपली भूमिका मांडली. ‘आस्क सुनिता विलियम्स’ या स्पर्धेंतर्गत विद्यार्थ्यांना विलियम्स यांना विविध प्रश्न विचारण्याचीदेखील संधी मिळाली.
तिसऱ्या ‘मिशन’साठी सुरू आहे तयारी
यावेळी सुनिता विलियम्स यांनी त्यांच्या भविष्यातील योजनांबाबतदेखील माहिती दिली. सद्यस्थितीत मी ‘बोईंग’च्या ‘स्टारलाईनर’ या ‘स्पेसक्राफ्ट’च्या पहिल्या ‘पोस्ट सर्टिफिकेशन मिशन’अंतर्गत प्रशिक्षण घेत आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात त्यांच्या तिसऱ्या सर्वात लांब ‘मिशन’वरदेखील काम सुरू आहे. मी व माझे सहकारी ‘बोईंग’च्या नवीन ‘स्पेसक्राफ्ट’ प्रणालीला विकसित करण्याच्या योजनेतदेखील सहभागी आहोत. या नवीन प्रणालीमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ‘क्र्यू ट्रान्सपोर्टेशन’ हे ‘राऊंडट्रीप’ पद्धतीने शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले.