नागपूर विद्यापीठात चेहऱ्याच्या माध्यमातून ‘हायटेक’ हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:52 AM2018-10-10T11:52:56+5:302018-10-10T11:55:12+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाने चक्क विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याच्या माध्यमातून ‘हायटेक’ हजेरी घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी विभागात ‘फेस-रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक पदव्युत्तर विभाग तसेच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी नावापुरतीच असल्याचे दिसून येते. नियमांना धाब्यावर बसवून पारंपरिक हजेरीपुस्तकात विद्यार्थ्यांची उपस्थितीदेखील दाखविण्यात येते. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर ‘हायटेक’ नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाने चक्क विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याच्या माध्यमातून ‘हायटेक’ हजेरी घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी विभागात ‘फेस-रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. विदर्भासोबतच राज्यातील विद्यापीठामधील अशाप्रकारचा हा पहिला प्रयोग असल्याचा दावा विभागातर्फे करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्गांमध्ये ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती ही फारच कमी असते. आश्चर्याची बाब म्हणजे काही पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी अनुपस्थित असतानादेखील हजेरीपुस्तकावर त्यांना हजर दाखविण्यात येते. वर्गांमध्ये उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांचेदेखील शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका असतो.
वरील बाबी लक्षात घेऊन नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाने ‘हायटेक’ हजेरीचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला व या वर्षीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयाने ‘फेस-रिकग्निशन’ मशीन लावली आहे. विद्यार्थ्यांचे चेहरे या ‘मशीन’मध्ये नोंदविण्यात आले आहे. विभागात आल्यानंतर विद्यार्थी तसेच शिक्षकांना या मशीनसमोर उभे राहावे लागणार आहे. ‘मशीन’मध्ये चेहऱ्यांची नोंद झाल्यानंतर विद्यार्थ्याची हजेरी लागेल व त्यानंतरच विभागाचा दरवाजा उघडेल, अशी प्रणाली येथे अमलात येणार आहे.
देशातील पहिला प्रयोग असल्याचा दावा
आमचा विभाग तंत्रज्ञानाच्या दृष्टीने परिपूर्ण असावा, असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. विद्यापीठाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्ट क्लासरुम्स’, त्यांचे काम दर्शविणारी ‘एलईडी स्क्रीन’ अशा सुविधा आम्ही विकसित केल्या. मात्र विद्यार्थी विभागात उपस्थित राहणे सर्वात जास्त आवश्यक आहे. त्यांना शिस्त लागावी, तसेच उपस्थिती वाढावी आणि आमच्याकडेदेखील अधिकृत ‘डाटा’ उपलब्ध राहावा, यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. पाश्चिमात्य देशांमधील विद्यापीठांमध्ये अशी प्रणाली दिसून येते. आपल्या देशातील विद्यापीठात अशी प्रणाली कुठेही नाही. देशातील विद्यापीठातील हा पहिला प्रयोग असल्याचा दावा विभागप्रमुख डॉ. धर्मेश धवनकर यांनी केला.
सुरक्षेसाठीदेखील महत्त्वाचे पाऊल
विभागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने ‘सीसीटीव्ही’देखील लागले आहेत. मात्र ‘फेस-रिकग्निशन’ मशीन ही विभागाच्या प्रवेशद्वारावरच लावण्यात आली आहे. मशीनमध्ये नोंद झाल्यानंतरच दरवाजा उघडणार आहे. अभ्यागत व्यक्ती आल्यास विभागाच्या आतून विशिष्ट ‘कार्ड’द्वारे ‘पंचिंग’ करावे लागेल. तेव्हाच त्या व्यक्तीला आत प्रवेश घेता येईल. सोबतच त्याचा चेहरादेखील मशीनमध्ये नोंदविल्या जाईल. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील हे महत्त्वाचे पाऊल मानण्यात येत आहे. विविध ‘कॉर्पोरेट’ कार्यालये, अतिसंवेदनशील आस्थापनांमध्ये अशाप्रकारचे तंत्रज्ञान लागले आहे. मात्र विद्यापीठातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.