रातुम नागपूर विद्यापीठात ‘स्वयम्’द्वारे हायटेक धडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:16 AM2018-07-24T10:16:02+5:302018-07-24T10:20:05+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरुवातीला याबाबत उदासीनता होती. मात्र आता प्रशासनाने यासंदर्भात पावले उचलण्यास सुरुवात केली असून पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना ‘हायटेक’ धडे उपलब्ध राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ‘यूजीसी’तर्फे ‘स्वयम्’च्या (स्टडी वेब्ज आॅफ अॅक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अॅस्पायरिंग माईन्ड्स) रूपाने संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘स्वयम्’च्या माध्यमातून संचालित ‘मूक’ (मॅसिव्ह ओपन आॅनलाईन कोर्सेस) अभ्यासक्रम देशभरातील विद्यापीठांनी या शैक्षणिक सत्रापासून आपल्या अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट करून घ्यावे, असे निर्देश ‘यूजीसी’तर्फे देण्यात आले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरुवातीला याबाबत उदासीनता होती. मात्र आता प्रशासनाने यासंदर्भात पावले उचलण्यास सुरुवात केली असून पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना ‘हायटेक’ धडे उपलब्ध राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘लोकमत’ने विद्यापीठाच्या उदासीनतेवर सर्वात अगोदर प्रकाश टाकला होता हे विशेष.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांच्याकडून संधी, समानता आणि गुणवत्ता या शिक्षणप्रणालीच्या तीन आधारभूत तत्त्वांवर आधारित ‘स्वयम्’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
‘आॅनलाईन’ माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्याससाहित्य घरबसल्या उपलब्ध करून देणे हा यामागील महत्त्वाचा उद्देश आहे. अगदी नववीपासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी येथे विविध ‘मॉड्युल्स’ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे देशभरातील हजारहून अधिक अनुभवी शिक्षक व प्राध्यापकांनी हे ‘मूक’ अभ्यासक्रम व अभ्याससाहित्य तयार केले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी यासाठी सर्व विद्यापीठांनी पुढील शैक्षणिक सत्रापासून ‘स्वयम्’च्या ‘प्लॅटफॉर्म’वरील ‘मूक’ अभ्यासक्रमाचा अंगीकार करावा, अशी सूचना ‘यूजीसी’तर्फे देण्यात आली आहे. यासंदर्भात १ मे रोजी कुलगुरूंना पत्रदेखील पाठविण्यात आले. यासाठी प्राधिकरणांच्या आवश्यक त्या परवानग्या १ जुलैच्या अगोदर घेऊन त्या पद्धतीने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, असेदेखील निर्देश ‘यूजीसी’ने दिले. मात्र नागपूर विद्यापीठात अभ्यास मंडळे स्थापित व्हायला उशीर झाला. शिवाय व्यवस्थापन परिषदेची स्थापनादेखील खोळंबली. अशा स्थितीत १ जुलैपर्यंत या ‘मूक’ अभ्यासक्रमांना परवानगी मिळणे अशक्यप्राय बाब होती. परंतु २०१९-२० पासून ही प्रणाली लागू करण्याचे विद्यापीठाने ठरविले आहे. यासंदर्भात विद्यापीठाने महाविद्यालयीन पातळीवर ‘मेन्टॉर’ नेमण्याची प्रक्रिया सुरू केली असून शिक्षकांना त्यात नोंदणी करायची आहे. ‘स्वयम’मधील अभ्यासक्रम हे ‘चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम’मध्ये समाविष्ट होणार आहेत. तसेच यासाठी ‘यूजीसी’ने ‘क्रेडिट फ्रेमवर्क’देखील जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमांसाठी २० टक्क्यांपर्यंत ‘क्रेडिट’ राहणार आहे.
नववीपासून ते स्नातकोत्तर अभ्यासक्रम उपलब्ध
‘स्वयम्’च्या माध्यमातून अगदी नववीपासून ते स्नातकोत्तर पातळीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांमध्ये ‘व्हिडीओ लेक्चर्स’, स्वअध्ययनासाठी ‘टेस्ट’ आणि अगदी शंकासमाधानासाठी ‘आॅनलाईन’ सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांचे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रदेखील देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र औपचारिक शिक्षण संस्थांच्या पदवीच्या समकक्ष असेल. सद्यस्थितीत यात दोन हजारांहून अधिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. नागपूर विद्यापीठात यातील नेमक्या किती गोष्टींची अंमलबजावणी करू शकणार हे सध्या तरी अस्पष्टच आहे.
विद्यापीठ सकारात्मक : प्र-कुलगुरू
यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना विचारणा केली असता विद्यापीठ याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वर्षी ही प्रणाली लागू करता येणे शक्य नाही. मात्र पुढील शैक्षणिक वर्षापासून निश्चित याला लागू करण्यात येईल. यासाठी अभ्यासक्रम प्रणालीत बदल, दिशानिर्देश जारी करणे इत्यादी प्रक्रिया अभ्यास मंडळांच्या मार्फत करावी लागणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले. ‘स्वयम’साठी डॉ.रेखा शर्मा यांना विद्यापीठाने समन्वयक म्हणून नेमले असून लवकरच सर्व महाविद्यालयांतील शिक्षकांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे.