‘हायटेक’ नागपूर विद्यापीठाला मराठीचा तिटकारा, संकेतस्थळाची मराठी आवृत्ती ‘अपडेट’ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:43 PM2017-08-28T22:43:26+5:302017-08-28T22:43:58+5:30
ज्या मराठी भाषेबद्दल ‘अमृतातेही पैजा जिंके’ असे म्हटले जाते. ज्या मराठी भाषेच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विद्यापीठाच्या माजी विभागप्रमुखांकडे होते.
- योगेश पांडे
नागपूर, दि. 28 - ज्या मराठी भाषेबद्दल ‘अमृतातेही पैजा जिंके’ असे म्हटले जाते. ज्या मराठी भाषेच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विद्यापीठाच्या माजी विभागप्रमुखांकडे होते. ज्या मराठी भाषेचा सातासमुद्रापार डंका वाजत आहे, तिच्याबद्दल ‘हायटेक’ होत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ फारसे गंभीर नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. तंत्रज्ञानाच्या युगात संकेतस्थळ हे विद्यापीठाला सर्व जगाशी जोडणारे माध्यम आहे. मात्र ‘आॅनलाईन’ सुधारणांचे मोठमोठे दावे होत असले तरी संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीकडे अधिका-यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. संकेतस्थळावर अद्यापही जुनीच माहिती उपलब्ध असून काही अपवाद वगळता येथे ‘अपडेट’ करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही.
‘ई-रिफॉर्म्स’साठी नागपूर विद्यापीठाने अनेक सकारात्मक पावले उचलली. परंतु ‘आॅनलाईन’ सुधारणाचे मूलभूत अंग असलेल्या संकेतस्थळाचा मात्र हवा तसा विकास झालेला नाही. अनेकदा तर संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीवर प्रशासनाच्या विविध अधिसूचना, परिपत्रके ‘अपलोड’च होत नसल्याचे आढळून आले आहे. यासंबंधात प्रशासनाकडून संबंधित अधिकाºयांना कधीही जाब विचारला जात नाही हे विशेष.
अनेक विद्यार्थी विभागांची माहिती व्हावी यासाठी संकेतस्थळाचा आधार घेतात. परंतु बºयाच विभागांची सद्यस्थितीतील माहितीच उपलब्ध नाही. अनेक विभागांमध्ये तर २ ते ३ वर्षांअगोदरची माहिती दिसून येत आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे नवीन विद्यापीठ कायदा अस्तित्वात आल्यानंतर विद्याशाखांची संख्या ४ इतकी झाली आहे. मात्र संकेतस्थळावर अद्यापही सर्व कारभार नऊ विद्याशाखांना अनुसरुनच दाखविण्यात येत आहे. दुसरीकडे विद्यापीठाद्वारे संचालित करण्यात येत असलेल्या ‘एलआयटी’ तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाची संकेतस्थळावरील ‘लिंक’च उघडत नाही. अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजीची अडचण असते. त्यामुळे विविध माहिती मिळविण्यासाठी ते मराठी आवृत्तीची मदत घेतात. मात्र येथे चुकीची माहिती उपलब्ध आहे. यातूनच मराठी ‘आॅनलाईन’ सुधारणांचे मोठमोठे दावे करणाºया नागपूर विद्यापीठ संकेतस्थळाच्या बाबतीत अद्यापही हवे तसे प्रगत झालेले नाही हेच स्पष्ट होेत आहे.
काणे, वंजारी अद्याप विभागप्रमुखच...
संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीकडे विद्यापीठाचे कसे दुर्लक्ष आहे, याचे आणखी एक उदाहरण म्हणजे विविध विभागांबाबतची अपुरी व चुकीची माहिती. डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे गेल्या सव्वातीन वर्षांहून अधिकच्या काळापासून विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. तर डॉ.शशीकला वंजारी यांची मुंबई येथील ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड होऊन महिना उलटून गेला आहे. मात्र दोघेही अद्यापपर्यंत अनुक्रमे सांख्यिकीशास्त्र व पदव्युत्तर शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणूनच दर्शविण्यात येत आहेत.