हायटेक वंदे भारत आता नागपूर ते हैदराबाद मार्गावर, मंत्री, खासदार यांच्या पाठपुराव्याला यश
By नरेश डोंगरे | Published: May 26, 2023 02:31 PM2023-05-26T14:31:56+5:302023-05-26T14:33:47+5:30
लवकरच मिळणार ग्रीन सिग्नल
नागपूर : देशातील हायटेक ट्रेन मानली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस आता नागपूर - हैदराबादरेल्वे मार्गावर धावणार आहे. सत्तापक्षातील मंत्री, खासदार यांनी या संबंधाने पाठपुरावा केला होता. त्याला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे लवकरच नागपूर ते हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे.
५१८ किलोमिटर अंतराच्या हैदराबाद शहरात जाण्यासाठी नागपूरहून सध्या १० ते ११ तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास सुमारे पाच तासांचा वेळ वाचेल.
महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडणाऱ्या नागपूर - हैदराबाद रेल्वेमार्गावर जवळपास प्रत्येकच रेल्वेगाडी हाऊसफुल्ल असते. दक्षिण भारतातील प्रवाशांचा या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भरणा असतो. त्यामुळे नागपूर मार्गे बऱ्याचशा रेल्वेगाड्या या लोहमार्गावर धावत असतात. मात्र, लांब पल्ल्याच्या या प्रवासाला प्रदीर्घ वेळ लागत असल्याने अनेक शहरातील प्रवासी रेल्वेऐवजी विमानाने प्रवास करने पसंत करतात. या पार्श्वभूमीवर, देशाचे मध्यस्थळ असलेल्या नागपूरहून हैदराबादला जाण्यासाठी वंदे भारत सारखी सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण रेल्वेगाडी सुरू व्हावी, अशी हजारो प्रवाशांची ईच्छा होती.
राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे कागदोपत्री पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले असून लवकरच नागपूर हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून या संबंधाने अधिकृत माहिती मिळालेली नाही.
अनेक जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ
ही गाडी सुरू झाल्यास नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील प्रवाशांना त्याचा विशेष फायदा होईल. कमी वेळेत तेलंगणाचा प्रवास करने सुविधाजनक होईल. सोबतच जबलपूर, रायपूरसाठीही रेल्वेची कनेक्टीव्हिटी मिळेल. सूत्रांच्या मते, नागपूर- हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे ठरले असले तरी ती कधीपासून धावणार त्याचा मुहूर्त अद्याप निश्चित झाला नसल्याचे समजते.
सेवाग्रामलाही मिळणार थांबा
तूर्त ही गाडी नागपूरहून बल्लारपूर, शिरपूर, रामगुंडम, काझीपेठ आदी स्थानकावर थांबे घेऊन हैदराबादला पोहचेल. मात्र, या स्थानकांसोबतच वंदे भारतचा थांबा सेवाग्राम आणि हिंगणघाट रेल्वेस्थानकावरही दिला जावा, अशी मागणी खास. तडस यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे केली आहे. सध्या नागपूर ते जबलपूर या मार्गावर वंदे भारत धावते. प्रस्तावित नागपूर हैदराबाद सुरू झाल्यास नागपूरहून धावणारी ही दुसरी वंदे भारत ठरेल.