हायकमांडने पाहिजे तशी मदत केली नाही : विजय वडेट्टीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 08:06 PM2019-10-29T20:06:46+5:302019-10-29T20:08:55+5:30
विधानसभा निवडणुकीत हायकमांडने पाहिजे तशी मदत केली नाही. काँग्रेस नेत्यांच्या सभा मागितल्या, पण मिळाल्या नाहीत. या सभांनी राज्यात वातावरण निर्मितीत भर पडली असती व काँग्रेसच्या २५ जागा वाढल्या असत्या, अशा शब्दात काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला घरचा अहेर दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीत हायकमांडने पाहिजे तशी मदत केली नाही. काँग्रेस नेत्यांच्या सभा मागितल्या, पण मिळाल्या नाहीत. राहुल गांधी यांच्या काही सभा मिळाल्या. प्रियंका गांधी यांच्या ५५ सभा मागितल्या होत्या. मात्र, एकही सभा मिळाली नाही. या सभांनी राज्यात वातावरण निर्मितीत भर पडली असती व काँग्रेसच्या २५ जागा वाढल्या असत्या, अशा शब्दात काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला घरचा अहेर दिला आहे.
नागपुरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आम्ही निवडणुकीला गांभीर्याने सामोरे गेलो नाही. आम्ही बॅकफूटवर होतो. ही निवडणूक जिंकू शकलो असतो पण कुणालाच अंदाज आला नाही. विदर्भात काही जागा आम्ही चुकीच्या पद्धतीने वाटल्या. मी स्वत: व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नवीन होतो. आम्हाला उमेदवारांचा अंदाज आला नाही. अभ्यास करायला पुुरेसा वेळ मिळाला नाही. शिवाय साधनसामुग्रीत आम्ही कमी पडलो. नाहीतर विदर्भात आणखी १० जागा वाढल्या असत्या, अशी खंतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.