नंदनवन परिसरात चोरांचा हैदोस, नागरिकांमध्ये दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:10 AM2021-08-19T04:10:53+5:302021-08-19T04:10:53+5:30
नागपूर : नंदनवन पोलीस ठाणे परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये सध्या चोरांनी हैदोस घातला आहे. दर दिवसाआड होणाऱ्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये ...
नागपूर : नंदनवन पोलीस ठाणे परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये सध्या चोरांनी हैदोस घातला आहे. दर दिवसाआड होणाऱ्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. अनेक घटना तर पोलीस ठाण्यात दाखलच होत नाही आहेत.
श्रीकृष्णनगर येथील आदेश तागडे यांच्या घरी कीर्ती किराणा स्टोर्स आहे. ८ ऑगस्ट रोजी रात्री आदेश कुटुंबासह दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या घरी झोपले होते. दरम्यान चोरांनी दुकानाला लागलेली लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश केला आणि २२ हजार रुपये किमतीचे तेलाचे डबे, आणि १३,५०० रुपये राेख चोरून नेली. सकाळी चोरीची घटना उघडकीस आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीची घटना कैद झाली.
त्याचप्रकारे या परिसरातीलच नीलेश गायकवाड हे १५ ऑगस्ट रोजी परिवारासह सासूरवाडीला गेले हाेते. मध्यरात्रीदरम्यान अज्ञात आरोपींनी त्यांच्या घराचे कुलूप ताेडून ६० हजार रुपये किमतीचे दागिने आणि ८ हजार रुपये रोख चोरून नेले. याच दिवशी शेषनगर येथील एका घरातून रोख रक्कम व वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. श्रीकृष्णनगर येथील महेश लाेखंडे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी बाईकवर दोन युवक महेशच्या वडिलांजवळ आले. वीजलाईनच्या कामाचे कंत्राट मिळाल्याचे सांगून आत प्रवेश केला. तेथून १० हजार रुपये किमतीचे विजेचे तार चोरून नेले.
या प्रकारच्या घटना ही रोजचीच बाब झाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.