पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे नागपूर जिल्ह्यात ‘हाय अलर्ट’, काळे कपडे असल्यास ‘नो एन्ट्री’
By योगेश पांडे | Published: April 9, 2024 11:10 PM2024-04-09T23:10:12+5:302024-04-09T23:11:02+5:30
नियोजित वेळापत्रकानुसार पंतप्रधानांचे सभास्थळी पाच वाजताच्या सुमारास आगमन होईल. त्यादृष्टीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेक लोकसभा मतदारसंघातील कन्हान येथे बुधवारी आयोजित प्रचार सभा लक्षात घेऊन नागपूर जिल्ह्यात पोलीस यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर आहे. पंतप्रधान सभास्थळी हेलिकॉप्टरने जाणार असले तरी पोलिसांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते सभास्थळापर्यंत बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय काही मार्गांवर वाहतूक व्यवस्थेतदेखील बदल करण्यात आला आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार पंतप्रधानांचे सभास्थळी पाच वाजताच्या सुमारास आगमन होईल. त्यादृष्टीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. सभास्थळी डोम उभारण्यात आले असून तेथे प्रत्येकाची कडेकोट तपासणी करण्यात येणार आहे.
पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. बुधवारी दुपारी २ ते ९ या वेळेत मानकापूरकडून कामठीकडे जाणारी अवजड वाहने नवीन काटोल नाका चौक, कोराडीकडे वळविण्यात येणार आहेत. आशा हॉस्पिटल, कामठीकडे जाणारी वाहने खापरखेडा मार्गाने जातील. कळमनाकडून येणारी वाहने कळमना टी-पॉइंट येथे थांबवून आशा हॉस्पिटल मार्गे खापरखेडाकडे रवाना करण्यात येतील.
इंदोराहून ऑटोमोटिव्ह चौकाकडे जाणारी वाहने ऑटोमोटिव्ह चौकातून डावे वळण घेऊन मानकापूर चौकाच्या दिशेने जातील. पंतप्रधान हेलिकॉप्टरने सभेच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मार्गावरदेखील बंदोबस्त लावून पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. ग्रामीण पोलिसांनी जारी केलेल्या सूचनांनुसार सभास्थळी पाण्याच्या बॉटल, डबा, बॅग नेण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच काळे कपडे घालून येण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. काळ्या कपड्यात कुणी आढळला तर त्याला सभास्थळी प्रवेश नाकारण्यात येणार आहे.