हिंसा-चकमकीनंतर उपराजधानीत 'हायअलर्ट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 11:54 AM2021-11-15T11:54:40+5:302021-11-15T12:08:31+5:30

रविवारी सायंकाळीसुद्धा सर्व झोनमधील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी रुट मार्च केला. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवणे आणि अफवा पसरविणाऱ्यांची लगेच माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

High alert in nagpur after the amravati riot and gadchiroli encounter | हिंसा-चकमकीनंतर उपराजधानीत 'हायअलर्ट'

हिंसा-चकमकीनंतर उपराजधानीत 'हायअलर्ट'

Next
ठळक मुद्देडॉ. उपाध्याय यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक संशयितांवर ठेवली जात आहे नजर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अमरावतीत घडलेला हिंसाचार आणि गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी झालेली चकमक या घटनेनंतर नागपूरसह आजूबाजूच्या शहरांमध्ये तगडी सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. शहर, नागपूर आणि गडचिरोली रेंजच्या सुरक्षाव्यवस्थेचे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले एडीजी वाहतूक प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी रविवारी परिस्थितीचा आढावा घेतला. कुठलीही अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून गुन्हेगार व अफवा पसरवण्यासाठी चर्चेत असलेल्या लोकांवर नजर ठेवली जात आहे.

अमरावतीच्या घटनेनंतर सर्व जिल्ह्यांना हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे. दंग्यासाठी चर्चेत असलेल्या शहरांमध्ये अतिरिक्त दक्षता बाळगली जात आहे. अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या आयुक्तालय व रेंजची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

डॉ. उपाध्याय यांच्याकडे शहर, नागपूर व गडचिरोली रेंजची जबाबदारी आहे. डॉ. उपाध्याय यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांसह विदर्भात अनेक पदांवर काम केले आहे. ते शनिवारी सायंकाळीच नागपुरात पोहोचले. त्यांनी रविवारी दुपारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त अश्वती दोर्जे, आयजी रेंज छेरिंग दोर्जे आणि ग्रामीणचे अधीक्षक विजय मगर यांच्याशी सुरक्षेवर चर्चा केली. अधिकाऱ्यांना संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढविण्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यासही सांगण्यात आले. शहर आणि नागपूर रेंजच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर डॉ. उपाध्याय गडचिरोलीला रवाना झाले. तिथे पोलीस चकमकीत २६ नक्षलवादी मारले गेल्याने नक्षलवाद्यांकडून हिंसाचार होण्याची शक्यता आहे.

नागपूर शहर पोलिसांनी शनिवारी दुपारपासूनच मोर्चा सांभाळला आहे. रविवारी सायंकाळीसुद्धा सर्व झोनमधील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी रुट मार्च केला. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवणे आणि अफवा पसरविणाऱ्यांची लगेच माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नाकाबंदीसह सर्व संवेदनशील भागांमध्ये सशस्त्र पाेलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

सर्व समाजातील नेत्यांशी चर्चा करून त्यांना पोलिसांना मदत करण्याची विनंती करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित संघटनांशी संबंधित आणि अफवा पसरविण्यात सहभागी असलेल्या लोकांवर नजर ठेवली जात आहे. यासाठी गुप्तहेर पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.

शांतता समित्यांची बैठक, जमावबंदीचा बट्ट्याबोळ

अमरावती दंगलीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहर पोलिसांनी रूट मार्च काढला होता. दरम्यान नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान रविवारी नागपुरात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यांत शांतता समित्यांच्या बैठकांचे आयोजन करून शहरात शांततेचे वातावरण प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले; परंतु कुठलीही रिस्क नको म्हणून पोलीस आयुक्तांनी रविवारी रात्री ८ वाजता जमावबंदीचा आदेश जारी केला; परंतु शहरातील महत्त्वाच्या पंचशील चौक, व्हेरायटी चौक, सीताबर्डी मार्केट, संविधान चौकात तसेच सीताबर्डीवरील हॉटेल्स अन् रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळाली. या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी एकही पोलीस रस्त्यावर दिसला नाही, हे विशेष. त्यामुळे सोमवारी पोलीस आयुक्तांच्या जमावबंदीला किती प्रतिसाद मिळतो, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिलिंदच्या उपस्थितीमुळे वाढली चिंता

शहर पोलिसांनी अमरावतीच्या हिंसेनंतर गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या खात्म्यालाही गंभीरतेने घेतले आहे. नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे नागपुरातही सक्रिय राहिलेला आहे. एकेकाळी त्याने वैशालीनगरात भाड्याने खोलीसुद्धा घेतली होती. त्याच्याशी संबंधित लोक आजही शहरात आहेत. नागपूर नेहमीच नक्षल समर्थितांचा गड राहिला आहे. पोलिसांनी वेळोवेळी येथे मोठे नक्षलवादी आणि त्यांच्या नेत्यांना पकडले आहे. काही लोक अजूनही तुरुंगात आहेत. नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखानासुद्धा येथे सापडला आहे. ताज्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांशी संबंधित लोकांवर सातत्याने नजर ठेवली जात आहे.

Web Title: High alert in nagpur after the amravati riot and gadchiroli encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.