रितू मालू यांना दणका, हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: June 26, 2024 11:20 AM2024-06-26T11:20:22+5:302024-06-26T11:20:49+5:30

Nagpur : मर्सिडिज कारने दोघांना चिरडण्याचे प्रकरण

High Court denies pre-arrest bail to Ritu Malu | रितू मालू यांना दणका, हायकोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला

High Court denies pre-arrest bail to Ritu Malu

राकेश घानोडे
नागपूर :
मद्यधुंद अवस्थेत मर्सिडिज कार चालवून दोन तरुणांना चिरडल्याचा आरोप असलेल्या ३९ वर्षीय धनाढ्य 
महिला रितिका उर्फ रितू दिनेश मालू यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावला. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला.

ही हृदयद्रावक घटना २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुल्यावर घडली. रितिका मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडिज कार चालवित होत्या. दरम्यान, त्यांची कार अनियंत्रित होऊन आधी रामझुल्याच्या कठड्याला धडकली व त्यानंतर कारने मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३४, रा. जाफरनगर) हे दोन तरुण मित्र स्वार असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही तरुण दूरवर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना जवळच्या मेयो रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी मोहम्मद हुसैनला तपासून मृत घोषित केले, तर मोहम्मद आतिफचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारमध्ये रितिकाची मैत्रीण माधुरी शिशिर सारडा यादेखील बसल्या होत्या. दोघीही सीपी क्लब येथे पार्टी करून घरी जात होत्या.

तहसील पोलिसांनी मालू व सारडा यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), २७९ (निष्काळजीपणाने वाहन चालविणे), ३३६ (मानवी जीव धोक्यात टाकणारी कृती करणे), ३३८ (गंभीर जखमी करणे), ४२७ (आर्थिक नुकसान करणे) आणि मोटर वाहन कायद्यातील कलम १८४ (भरधाव वेगात वाहन चालविणे) व १८५ (दारूच्या नशेत वाहन चालविणे) या गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे.

Web Title: High Court denies pre-arrest bail to Ritu Malu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.