उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मतदानासाठी लागले रांगेत, सर्वसामान्यांप्रमाणे मतदान
By योगेश पांडे | Published: April 19, 2024 12:05 PM2024-04-19T12:05:44+5:302024-04-19T12:06:39+5:30
त्यांच्या या साधेपणामुळे सर्वसामान्यांकडूनदेखील कौतुकोद्गार काढण्यात येत होते.
नागपूर : एरवी मतदान करताना व्हीआयपी किंवा मोठे अधिकारी थेट मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावताना दिसतात. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत लागून मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यांच्या या साधेपणामुळे सर्वसामान्यांकडूनदेखील कौतुकोद्गार काढण्यात येत होते.
न्या.सांबरे यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या धंतोली येथील सुळे हायस्कूलमधील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान केंद्रावर मतदारांची रांग होती. त्यामुळे न्या.सांबरे हे रांगेतच लागले व सर्वसामान्यांप्रमाणेच मतदान केले.
याशिवाय प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनीदेखील आपले कर्तव्य बजावले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी त्यांच्या पत्नीसह रवीनगरातील सी.पी.ॲंड बेरार शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले. त्याच मतदान केंद्रावर पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनीदेखील मतदानाचे कर्तव्य पार पाडले. नागपूर विभागाच्या अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला.