हायकोर्टाची सुरक्षा धोक्यात
By Admin | Published: November 12, 2014 12:59 AM2014-11-12T00:59:30+5:302014-11-12T00:59:30+5:30
तिघांनी स्वत:ला जाळून हायकोर्टाच्या परिसरात प्रवेश केल्यामुळे या संवेदनशील स्थळाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हायकोर्टातील सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर व बॅगेज
संवेदनशील स्थळ : सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर, बॅगेज स्कॅनर खराब
नागपूर : तिघांनी स्वत:ला जाळून हायकोर्टाच्या परिसरात प्रवेश केल्यामुळे या संवेदनशील स्थळाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हायकोर्टातील सीसीटीव्ही कॅमेरे, मेटल डिटेक्टर व बॅगेज स्कॅनर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. राज्य शासनाचा गृह विभाग गफलतीत आहे. अशा परिस्थितीत हायकोर्टाची सुरक्षा कशी होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या पहिल्या प्रवेशद्वारावर तैनात पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून वेगवान हालचाली केल्यामुळे जळालेल्या अवस्थेतील तिघेही इमारतीमध्ये प्रवेश करू शकले नाही. पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वाराच्या आत काही अंतरावर पकडून आग विझविली. अन्यथा या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले असते. हायकोर्टाची इमारत राष्ट्रीय ठेवा आहे. येथे अनेक संवेदनशील प्रकरणे प्रलंबित आहेत. न्यायालयात रोज हजारावर वकील व हजारावर पक्षकारांची रेलचेल असते. यामुळे या परिसराला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे. असे असतानाही राज्याचा गृह विभाग गेल्या दीड-दोन वर्षांपासून झोपा काढत आहे. हायकोर्ट परिसरातील हालचाली टिपण्यासाठी १६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार यापैकी १-२ कॅमेरेच सुरू आहेत. गेल्यावर्षी मुसळधार पावसामुळे वायरिंग खराब झाल्याने कॅमेरे बंद पडले. तेव्हापासून बंद कॅमेरे सुरू करण्यात आलेले नाहीत किंवा नवीन कॅमेरेही बसविण्यात आले नाहीत. याशिवाय काही मेटल डिटेक्टर व बॅगेज स्कॅनर बंद आहेत.
आजच्या घटनेमुळे गंभीर नुकसानकारक काहीच घडले नसले तरी त्याऐवजी काहीतरी विध्वंसक घडू शकले असते, अशी शक्यता टाळता येत नाही. त्यावेळी सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्यांकडे काय उत्तर असते, याचा विचार त्यांनीच करण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)
सर्वोच्च न्यायालयाचा आदर्श ठेवावा
काही वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, नोंदणी नसलेले वकील व पक्षकारांना सर्वोच्च न्यायालयात २० सुरक्षा काऊंटर्स पार करावे लागतात. दरम्यान, त्यांना वैयक्तिक माहितीचा फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यांचे छायाचित्र काढून पास दिली जाते. पाससोबत पक्षकाराला अन्य शासकीय ओळखपत्र व वकिलाला संबंधित बार असोसिएशनचे ओळखपत्र जोडणे आवश्यक असते. प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक तपासली जाते.
पोलिसांची सतर्कता प्रशंसनीय
पहिल्या प्रवेशद्वारावर सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी दाखविलेली सतर्कता प्रशंसनीय आहे. तिघेजण जळालेल्या अवस्थेत धावत येत असल्याचे पाहून कोणताही पोलीस घाबरून मागे हटला नाही. पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन तिघांना पकडले व पाणी ओतून आग विझविली. ४-५ मिनिटांच्या या थराराने संपूर्ण हायकोर्ट हादरले. पोलीस निरीक्षक एल. एच. भोगन, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार पवार, हेडकॉन्स्टेबल प्रमोद यादव, विजय पिंपळकर, पोलीस शिपाई गुरुदास ताडपलीवार, वैशाली लोही, प्रतिभा टिपले आदींनी ही कामगिरी केली.