मतदार यादी प्रकरणी नागपूर विद्यापीठाला हायकोर्टाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 08:59 PM2017-11-22T20:59:00+5:302017-11-22T21:00:01+5:30
सिनेट व अभ्यास मंडळ निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये सहा प्राध्यापकांचा समावेश न करण्याचे वादग्रस्त आदेश रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दणका दिला आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सिनेट व अभ्यास मंडळ निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये सहा प्राध्यापकांचा समावेश न करण्याचे वादग्रस्त आदेश रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दणका दिला आहे.
योगेश मुनेश्वर, निरंजन ब्राह्मणे, अरविंद पाटील, डॉ. रवींद्र सहारे, सोनाली खांडेकर व कल्पना बंडीवार अशी प्राध्यापकांची नावे असून ते वर्धा येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयात कार्यरत आहेत. संबंधित मतदार यादीसाठी प्राध्यापकांची नावे १३ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन किंवा कागदोपत्री सादर करणे आवश्यक होते. अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाने आॅनलाईन यादी सादर केली नाही. त्यामुळे या प्राध्यापकांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला नाही. परिणामी प्राध्यापकांनी सुरुवातीला निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप सादर केले होते. ५ आॅक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचे आक्षेप खारीज केले. त्या निर्णयाविरुद्ध प्राध्यापकांनी कुलगुरूंकडे अपील दाखल केले. कुलगुरुंनी १२ आॅक्टोबर व १६ आॅक्टोबर २०१७ रोजी सर्वांचे अपील फेटाळले. परिणामी प्राध्यापकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी विविध बाबी लक्षात घेता विद्यापीठ व महाविद्यालयाच्या चुकीमुळे पात्र प्राध्यापकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही असे स्पष्ट करून विद्यापीठाचे सर्व वादग्रस्त आदेश रद्द केले व संबंधित प्राध्यापकांचा मतदार यादीमध्ये समावेश करण्याचा निर्णय दिला.