जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाचा समन्स
By Admin | Published: March 15, 2016 04:56 AM2016-03-15T04:56:33+5:302016-03-15T04:56:33+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी जरीपटका भागातील मनोरुग्णालय रोडवरील अतिक्रमणाच्या
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी जरीपटका भागातील मनोरुग्णालय रोडवरील अतिक्रमणाच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावला व १७ मार्च रोजी व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले.
यासंदर्भात बेझनबाग महिला कृती समितीने जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विकास आराखड्यानुसार मनोरुग्णालय रोड ८० फुटांचा असून अतिक्रमणामुळे हा रोड कुठे ६० तर कुठे ४० फुटांचा शिल्लक राहिला आहे. यामुळे रोडने जाणाऱ्या-येणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले, पण त्यात समाधानकारक माहिती दिली नाही. यामुळे न्यायालयाने त्यांना समन्स बजावला.(प्रतिनिधी)