जी. एन. साईबाबा प्रकरणी हायकोर्टाचा निकाल शहीदांच्या कुटुंबीयांसाठी दुर्दैवी- देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 09:06 PM2022-10-14T21:06:36+5:302022-10-14T21:07:13+5:30
Devendra Fadnavis on G. N. Saibaba: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे दिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis on G. N. Saibaba Case: जी. एन. साईबाबाप्रकरणी आजचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल हा शहीदांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, नक्षलवाद्यांशी लढताना ज्यांना आपला जीव गमवावा लागतो किंवा या लढ्यातील जे पोलिस, जवान शहीद होतात, त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा निकाल अतिशय धक्कादायक आणि निराशाजनक आहे. या निकालाविरोधात आम्ही तातडीने सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ज्याच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत, त्याला केवळ विलंबाने खटल्याची परवानगी मिळाली, या एका तांत्रिक कारणामुळे सोडून देणे, हा त्या शहीद कुटुंबांप्रति अन्यायकारक आहे. हे आम्ही सारे सर्वोच्च न्यायालयात योग्यप्रकारे मांडू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. या निकालामुळे त्या कुटुंबीयांना काय वाटत असेल, याचा विचार मी वारंवार करतो आहे.
नक्की काय होतं प्रकरण?
बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरविण्याच्या निर्णयाविरुद्ध नक्षल चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा व त्याच्या साथीदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या अपिल शुक्रवारी मंजूर करण्यात आल्या. सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारची मंजुरी घेण्यात आली नाही, या तांत्रिक कारणामुळे उच्च न्यायालयाने सर्वांना निर्दोष सोडले. न्यायमूर्तीद्वय रोहीत देव व अनिल पानसरे यांनी हा निर्णय दिला.