उच्चशिक्षितांनी समाजाला दूर लोटले : सुचित बागडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 10:55 PM2019-05-14T22:55:38+5:302019-05-14T22:57:05+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षांपासून गुलामगिरीच्या खाईत खितपत पडलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानात आरक्षणाची तरतूद केली. याच आरक्षणामुळे बहुजन वर्गातील लोकांची प्रगती झाली. उच्चशिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर नोकऱ्या मिळविल्या. मात्र, समाजाप्रति असलेली जबाबदारी ते विसरले. केवळ कुटुंबापुरतेच मर्यादित राहिले. त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित समाज घडविण्यात त्यांचे योगदान दिसत नाही, असे मत आंबेडकरी विचारवंत डॉ. सुचित बागडे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षांपासून गुलामगिरीच्या खाईत खितपत पडलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानात आरक्षणाची तरतूद केली. याच आरक्षणामुळे बहुजन वर्गातील लोकांची प्रगती झाली. उच्चशिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर नोकऱ्या मिळविल्या. मात्र, समाजाप्रति असलेली जबाबदारी ते विसरले. केवळ कुटुंबापुरतेच मर्यादित राहिले. त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित समाज घडविण्यात त्यांचे योगदान दिसत नाही, असे मत आंबेडकरी विचारवंत डॉ. सुचित बागडे यांनी व्यक्त केले.
भारत मुक्ती मोर्चातर्फे आयोजित जिल्हास्तरीय प्रबोधन संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. ‘मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया, मुझे निष्ठावान लोगों की आवश्यकता है’, असा या प्रबोधन संमेलनाचा विषय होता. माहेश्वरी सांस्कृतिक भवन, सीताबर्डी येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष डॉ. विवेक घाटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, बहुजन विचारवंत अरविंद माळी, डॉ. विमल कीर्ती उपस्थित होते.
डॉ. बागडे पुढे म्हणाले की, बाबासाहेबांनी १६ विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी पाठविले होते. शिक्षण पूर्ण करून ते मायदेशी परतल्यानंतर बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे वगळता एकानेही समाजाप्रति आपली जबाबदारी पार पाडली नाही. या शिक्षित लोकांनी आपले कुटुंब सांभाळून समाजालाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करायला पाहिजे होती. मात्र, तसे झाले नाही. ही घटना बाबासाहेबांसाठी वेदनादायी ठरली. त्यामुळे १८ मार्च १९५६ रोजी आग्रा येथील एका बुद्ध विहाराच्या उद्घाटनाला बाबासाहेब गेले असता, मार्गदर्शन करताना ‘मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया’, असे मत मांडल्याचे डॉ. बागडे यांनी सांगितले. हे वाक्य विदेशातून शिक्षण घेऊन मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी होते. मात्र, आजही समाजाची स्थिती फारशी बदलली नाही. बाबासाहेबांचे वाक्य उच्च शिक्षितांसाठी आजही लागू होते. कारण बहुजन वर्ग शिक्षणात बराच पुढे गेला आहे. शिक्षणामुळे त्यांच्या जीवनात क्रांती घडली. तशीच क्रांती त्यांनी समाजात घडवायला पाहिजे होती. मात्र, त्यांनी केवळ आपल्या कुटुंबाकडेच लक्ष दिले. त्यामुळे आजही समाजातील घटक त्याच स्थितीत आहे, असा घणाघाती अरोपही डॉ. बागडे यांनी केला.
शिक्षित वर्गाने कुटुंबासह आपल्या मिळकतीचा काही भाग समाजासाठी खर्च करावा. समाजाला योग्य दिशा द्यावी. मात्र, असे होताना दिसत नाही. परिणामी तरुण वर्ग दिशाहीन होत चालला आहे. देशात कुठेही समाजावर अन्याय झाला की, बहुजन वर्ग पेटून उठतो. अशावेळी शिक्षित, साहित्यिक आणि पुढाऱ्यांची गरज वाटते. त्रस्त झालेला तरुण वर्ग वेळप्रसंगी कुठल्याही नेत्याची वाट न पाहता स्वत:च आंदोलन उभारत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी वामन मेश्राम, डॉ. विवेक घाटे, डॉ. विमल कीर्ती, अरविंद माळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कमलेश सोरते यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. श्वेता बागडे यांनी तर आभार रवी घोडेस्वार यांनी मानले.