उच्चशिक्षित पत्नीला मारहाण
By Admin | Published: May 12, 2016 03:07 AM2016-05-12T03:07:05+5:302016-05-12T03:07:05+5:30
सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या उच्चशिक्षित पत्नीकडून घटस्फोट मिळावा म्हणून तिला भर रस्त्यात बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध...
हुडकेश्वरमधील घटना : पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा
नागपूर : सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या उच्चशिक्षित पत्नीकडून घटस्फोट मिळावा म्हणून तिला भर रस्त्यात बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. देवेंद्र मधुकर शेंडे असे आरोपी पोलीस हवालदाराचे नाव असून, त्याला मदत करणारा त्याचा भाऊ मारुती शेंडे तसेच वहिनी कल्पना शेंडेविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रीती देवेंद्र शेंडे (वय २७) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. सधन कुटुंबातील सदस्य असलेली प्रीती सध्या पीएच.डी. करीत आहे. घरच्यांचा विरोध झुगारून २०१० मध्ये तिने देवेंद्रसोबत प्रेमविवाह केला. नंतर माहेरच्यांनी नमते घेत प्रीती-देवेंद्रचे थाटात लग्न लावून दिले. महागड्या भेटवस्तूही दिल्या. दोन वर्षांपर्यंत सर्व सुरळीत होते.
नंतर प्रीती आणि देवेंद्रमध्ये वाद सुरू झाला. तो टोकाला पोहचला. त्यामुळे २०१४ मध्ये दोघेही विभक्त झाले. प्रीती अयोध्यानगरातील वडिलांच्या घरी राहू लागली. देवेंद्र मौदा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्यांच्यात घटस्फोटाची केस सुरू आहे. लवकर सोडचिठ्ठी मिळावी म्हणून देवेंद्र तिच्यासोबत तिच्या वडिलांवरही दबाव टाकत आहे.
मध्यस्थी करणारांनाही तो कमी जास्त बोलतो. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी ३ वाजता किरणापुरातील आपल्या वडिलांच्या मित्राच्या घरी गेली. तेथे देवेंद्र, त्याचा भाऊ अन् वहिनीही पोहचले. त्यांच्यात तेथे कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर प्रीतीच्या तक्रारीनुसार, देवेंद्रने प्रीतीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.जबर जखमी झालेल्या प्रीतीने हुडकेश्वर ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे प्रीतीने सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर यांना मदत मागितली. नूतन रेवतकर यांनी पोलिसांकडे हे प्रकरण रेटून धरल्यानंतर देवेंद्र, त्याचे भाऊ आणि वहिनीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)
उमरेडमध्येही मारहाण
भर रस्त्यावर पत्नीला बेदम मारहाण करण्याची देवेंद्रची ही दुसरी वेळ आहे. त्याने यापूर्वी उमरेड येथे कार्यरत असताना तेथेही प्रीतीला अशीच मारहाण केली होती. एवढेच नव्हे तर लग्नात मिळालेल्या भेटवस्तू हडपून तेथून प्रीतीला हाकलून लावले होते. आपण पोलीसमध्ये कार्यरत असल्याने आपले काहीच बिघडू शकत नाही, असा देवेंद्रचा गैरसमज होता. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर तो कोणती भूमिका घेतो, त्याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.