वेतनवाढ उच्चस्तरीय समितीच्या अहवालाची केली होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:32 PM2018-01-25T23:32:13+5:302018-01-25T23:33:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एस. टी. कर्मचाऱयांच्या वेतनवाढीसंदर्भात उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल एस. टी. कर्मचाऱयांच्या आयोग कृती समितीने फेटाळला आहे. या समितीच्या अहवालाची गुरुवारी घाट रोड, इमामवाडा, गणेशपेठ, वर्धमाननगर, मध्यवर्ती कार्यशाळा हिंगणा येथे होळी करण्यात आली.
आॅक्टोबर महिन्यात एस. टी. कर्मचाऱयांनी संप पुकारल्यानंतर उच्च न्यायालयाने या संदर्भात उच्चस्तरीय समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. वेतनवाढ उच्चस्तरीय समितीत राज्य शासनाच्या प्रधान सचिव तसेच आयुक्तांसारख्या अधिकाऱयांचा समावेश होता. हा अहवाल तयार करताना संपकर्त्या कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचे सौजन्य समितीने दाखविले नाही. अहवालात समितीने कर्मचाऱयांच्या वेतनवाढीचा अहवाल देण्याऐवजी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीचे विवरण केले. अहवालात भत्ते वाढविण्याऐवजी कमी केले. त्यामुळे गुरुवारी नागपुरात या अहवालाची होळी करण्यात आली. संघटनेचे प्रादेशिक सचिव अरुण भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपेठ बसस्थानकात संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष प्रवीण घुगे, दीपक बागेश्वर यांच्या नेतृत्वात, इमामवाडा आगारात अरुण बनसोड यांच्या नेतृत्वात, वर्धमाननगर आगारात सचिव झोडे तसेच हिंगणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेत सुभाष गोजे, प्रशांत निवल, मनोज शेंडे यांच्या नेतृत्वात कामगारांनी या अहवालाची होळी करून प्रशासनाचे लक्ष वेधले.