यंदा १६ जूनला हाेईल मान्सूनचे आगमन; पॅटर्न बदलल्याने आठवडाभराचा उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 08:00 AM2022-06-04T08:00:00+5:302022-06-04T08:00:01+5:30
Nagpur News ९ जूनपर्यंत मान्सून धडकणार असल्याचा अंदाज हाेता; पण आता मान्सूनला आठवडाभर उशीर हाेणार आहे.
राजीव सिंह
नागपूर : अतिशय आतुरतेने पावसाळ्याची वाट पाहणाऱ्या नागरिकांना पुन्हा काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ९ जूनपर्यंत मान्सून धडकणार असल्याचा अंदाज हाेता; पण आता मान्सूनला आठवडाभर उशीर हाेणार आहे. मागील पाच दशकांतील मान्सूनचा डेटा आणि तारखांचे विश्लेषण केले असता मान्सूनच्या पॅटर्नमध्ये बदल झाल्याचे दिसत असून, त्यानुसार ९ ऐवजी १६ जूनला पावसाचे आगमन हाेण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, मान्सूनचे ढग कधी बरसणार याबाबत हवामान विभागाकडून स्पष्ट काही सांगण्याचे टाळले जात आहे. मात्र पावसाचा पॅटर्न बदलल्याचे निश्चित मानले जात आहे. गेल्या वर्षीपर्यंत ९ जून हीच मान्सूनच्या आगमनाची तिथी मानली जात हाेती. मात्र दहा वर्षांचा अहवाल लक्षात घेतल्यास केवळ तीनदा १० जून किंवा त्यापूर्वी मान्सूनच्या सरी बरसल्या हाेत्या. २०१३ मध्ये १० जून, २०१८ मध्ये ६ जून व २०२१ साली ९ जूनला मान्सूनच्या आगमनाची घाेषणा हवामान विभागाने केली हाेती. विभागानुसार मे महिन्यात सरासरी ४० अंश सेल्सिअस तापमान असते, जे जूनमध्ये घसरून ३४ अंशांवर पाेहोचेल. जून महिन्यात सरासरी १६८.८ मि.मी. पावसाची नाेंद केली जाते. मागील दशकात २०१२, २०१४, २०१९ या वर्षी जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. या वर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नवीन मापदंडाच्या आधारे बदलली तिथी
हवामान विभागाचे क्षेत्रीय उपमहासंचालक एम. एल. साहू यांनी सांगितले, संपूर्ण मध्य भारतात मान्सूनच्या आगमनाची तारीख आठवडाभर पुढे गेली आहे. यापूर्वी नागपुरात ९ जूनला मान्सूनच्या आगमनाची निश्चित तारीख मानली जात हाेती. मात्र गेल्या ५० वर्षांच्या अहवालाचा अभ्यास केला असता, या वर्षी १६ जूनपर्यंत पावसाळ्याच्या सरी नागपुरात दाखल हाेणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. या कारणाने नवीन मापदंडानुसार आता १६ जून ही मान्सूनच्या आगमनाची तारीख निर्धारित करण्यात आली आहे.