रुग्णसंख्येचा उच्चांक : विदर्भात११५ रुग्णांची नोंद, दोन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 09:58 PM2020-06-10T21:58:00+5:302020-06-10T21:59:25+5:30
विदर्भात गेल्या दोन दिवसापासून रुग्णांची संख्या मंदावली असताना, बुधवारी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. एकाच दिवशी तब्बल ११५ रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या २४६९ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात गेल्या दोन दिवसापासून रुग्णांची संख्या मंदावली असताना, बुधवारी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. एकाच दिवशी तब्बल ११५ रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या २४६९ वर पोहचली आहे. अकोल्यात आज पुन्हा दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांची एकूण संख्या ८३ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ४२ रुग्णांची नोंद झाली असताना, आज त्याच्या दुप्पट ८५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील ६१ वर रुग्ण हे एकट्या नाईक तलाव व बांगलादेश वसाहतीतील आहेत. ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ८६२ वर पोहचली आहे. यात १५ मृत्यू तर ५२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अकोला जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मृत्यूची नोंद झाली. आज दोन मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४२ झाली, शिवाय २० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ८८४ झाली. यातील ५७७ रुग्ण बरे झाले. यवतमाळ जिल्ह्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या १६२ झाली असून, १२६ रुग्ण बरे झाले आहेत. येथे मृत्यूची संख्या तीन आहे. अमरावती जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली. रुग्णाची संख्या २८७ तर २०२ रुग्ण बरे झाले आहेत. अकोल्यानंतर सर्वाधिक मृत्यू या जिल्ह्यात आहेत. येथे मृत्यूची संख्या १७ आहे. बुलडाण्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ९६ झाली आहे. बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ६६ आहे. या जिल्ह्यात तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तीन रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या ४२ वर पोहचली आहे. यातील २३ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद नाही. वर्धा, भंडारा, गोंदिया, वाशिम व गडचिरोली जिल्ह्यात आज रुग्णाची नोंद झाली नाही.