उच्च दर्जाच्या कापसाचे उत्पादन ५ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:41 AM2021-02-05T04:41:41+5:302021-02-05T04:41:41+5:30

सुनील चरपे लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशात सरासरी ५,७७७ ते ६,४२३ मेट्रिक टन कापसाचे, तर महाराष्ट्रात सरासरी ८५ ...

High quality cotton production 5% | उच्च दर्जाच्या कापसाचे उत्पादन ५ टक्के

उच्च दर्जाच्या कापसाचे उत्पादन ५ टक्के

Next

सुनील चरपे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशात सरासरी ५,७७७ ते ६,४२३ मेट्रिक टन कापसाचे, तर महाराष्ट्रात सरासरी ८५ ते ९२ लाख रुईच्या गाठींचे उत्पादन हाेते. कापूस उत्पादनात भारत जगात प्रथम व महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण उत्पादनातील सरासरी ६० टक्के कापूस उच्च प्रतिचा अर्थात त्या कापसाची धाग्याची लांबी (स्टेपल लेन्थ) ३०.५ मिमी ते ३१.५ मिमी किंवा त्यापेक्षा अधिक असते. यावर्षी या उच्च प्रतिच्या कापसाचे उत्पादन केवळ ५ टक्के झाले आहे. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे उच्च प्रतिचा कापड (प्रीमियम प्राॅडक्ट) तयार करणारा उद्याेग संकटात आला आहे.

गुलाबी बाेंडअळी आणि बाेंडसडमुळे यावर्षी लांब व अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. दरवर्षी सरासरी ६० टक्के उत्पादन हाेणाऱ्या या उच्च प्रतिच्या कापसाचे उत्पादन यावर्षी ५ टक्क्यांवर आल्याची माहिती सीसीआयचे अधिकारी व जिनर असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. या उच्च प्रतिच्या कापसापासून तयार केले जाणारे कापड निर्यात केले जात असून, या भारतीय कापडाला आंतरराष्ट्रीय बाजारात माेठी मागणी असल्याचे कापड उद्याेगातील अधिकाऱ्यांनी सांगितले. कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे यावर्षी निर्यातक्षम कापड तयार करण्यास अडचणी येणार असल्याचेही तसेच उच्च प्रतिच्या कापडाची निर्यात प्रभावित हाेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशाच्या ‘जीडीपी’मध्ये कापड उद्याेगाचा वाटा १२ टक्के असून, जागतिक बाजारात कापड उद्याेगांचा वाटा हा १३ टक्के आहे. केंद्र शासनाने गुलाबी बाेंडअळी प्रतिबंधक बियाण्यांच्या उत्पादन व वापरावर बंदी घातल्याने ही समस्या उद्भवल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कापूस उत्पादन व कापड उद्याेगातील बियाणे उत्पादनापासून तर कापड निर्मितीतील जिनिंग, प्रेसिंग, स्विनिंग, विव्हिंग, ब्लिचिंग, प्रिंटिंग, बॅण्डिग, गारमेंट, तंत्रज्ञान, मशिनरी यासह तत्सम उद्याेगात किमान सहा काेटी लाेकांना राेजगार मिळाला असून, त्यांनाही या प्रकारामुळे समस्यांना ताेंड द्यावे लागत आहे.

...

सीसीआयच्या कापूस खरेदी ग्रेड

सीसीआय, कापूस पणन महासंघ व माेठे व्यापारी आखूड धाग्याचा कापूस (२० मिमीपेक्षा कमी लांबी) आसाम काेमिला व बंगाल देशी, मध्यम धाग्याचा कापूस (२०.५ ते २४.५ मिमी लांबी) जयधर, व्ही-७९७, जी काॅट-१३, एके, वाय-१, मध्यम लांब धाग्याचा कापूस (२५.० ते २७.० मिमी लांबी) जे - ३४, एलआरए - ५१६६, एफ - ४१४, एच - ७७७, जे - ३४, लांब धाग्याचा कापूस (२७. ते ३२.० मिमी लांबी) एफ - ४१४, एच - ७७७, जे - ३४, एच - ४, एच - ६, शंकर - ६, शंकर - १०, बन्नी, ब्रह्मा, अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस (३२.५ मिमीपेक्षा अधिक लांबी) एमसीयु - ५, सुरभी, डीसीएच - ३२, सुविन या ग्रेडने कापसाची खरेदी करतात.

...

ऑस्ट्रेलियन कापसाच्या मागणीत वाढ

गुलाबी बाेंडअळी प्रतिबंधक बियाण्यांच्या वापरावर बंदी असल्याने एकीकडे भारतीय कापड उद्याेग अडचणीत येत आहे. दुसरीकडे, जगात कापूस उत्पादनामध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियातील कापसाची जागतिक बाजारपेठेतील मागणी वाढत आहे. त्यामुळे जागतिक कापड बाजारातील भारताचे स्थान डळमळीत, तर ऑस्ट्रेलियाचे स्थान बळकट हाेण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. देशांतर्गत कापसावर आधारित उद्याेगातील या अडचणी दूर करण्यासाठी तसेच जागतिक बाजारातील भारताचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन करून ‘काॅमन प्लॅटफाॅर्म’ तयार करणे अत्यावश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Web Title: High quality cotton production 5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.