महामानवाचा शाळा प्रवेश दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:46 AM2017-10-29T01:46:42+5:302017-10-29T01:46:56+5:30

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश केला तो दिवस आता विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने यासंबंधात अध्यादेशसुद्धा जारी केला आहे.

High School Admission Day | महामानवाचा शाळा प्रवेश दिन

महामानवाचा शाळा प्रवेश दिन

Next
ठळक मुद्देविद्यार्थी दिवस म्हणून पाळणार

७ नोव्हेंबरला विविध उपक्रम राबविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश केला तो दिवस आता विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने यासंबंधात अध्यादेशसुद्धा जारी केला आहे.
७ नोव्हेंबर १९०० या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल, राजवाडा चौक जि. सातारा येथे शाळेत प्रवेश घेतला होता. त्यावेळी शाळेत भिवा म्हणून त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती. या शाळेतील रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर त्यांच्या नावाची नोंदणी व त्यासमोरील स्वाक्षरी ही ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून आजही शाळा प्रशासनाने जपून ठेवली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणजे एका अर्थाने शैक्षणिक क्रांतीची आणि युगांतराची चाहूल म्हटली पाहिजे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल शाळेत पडल्यामुळे ते स्वत: सुशिक्षित आणि प्रज्ञावंत झाले आणि करोडो दलितांचे-वंचितांचे उद्धारकर्तेही झाले. इतकेच नव्हे तर ज्या संविधानाचा आज सर्वात आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होत असतो त्या भारतीय संविधानाचे ते शिल्पकारही ठरले. परिणामत: भारतीय समाजात स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय ही मानवी मूल्ये रुजू शकली गेली म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत महत्त्वाची आणि इतिहासाला कूस बदलवयास लावणारी क्रांतिकारी घटना ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते. त्यांनी आपला हा विद्याव्यासंग आयुष्याच्या शेवटपर्यंत जपला, हे विशेष.
आजचा प्रत्येक विद्यार्थी हा या देशाचे भविष्य आहे. त्यामुळे आदर्श विद्यार्थी निर्माण होणे काळाची गरज आहे. शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमांची जाण सर्व विद्यार्थ्यांना होण्यासाठी ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असे शासनाने या अध्यादेशानुसार जाहीर केले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाठपुराव्यास उचित न्याय दिला, यासाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
महाविद्यालय स्तरावरही आयोजन व्हावे
शाळा,कनिष्ठ महाविद्यालयात दिवस साजरा करण्यात येणार असून महाविद्यालयांमध्येही हा दिवस साजरा करण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. मिलिंद माने यांनी पत्रकार परिषदेत केली. १४ एप्रिल हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांची होती. १४ एप्रिलला शाळांना सुटी असते. त्यामुळे शासनाने ७ नोव्हेंबर डॉ. आंबेडकरांचा प्रवेश दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. महाविद्यालय स्तरावरही हा दिवस साजरा झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
विविध कार्यक्रम घेण्याच्या सूचना
या अध्यादेशानुसार विद्यार्थी ७ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही अध्यादेशानुसार देण्यात आले आहेत.

Web Title: High School Admission Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.