कारागृह पोलीस भरती लेखी परीक्षेत हायटेक कॉपी

By योगेश पांडे | Published: September 30, 2024 05:51 PM2024-09-30T17:51:51+5:302024-09-30T17:53:04+5:30

‘माईक स्पाय’चा वापर, बाहेरून सांगितली जात होती उत्तरे : कॉपीबहाद्दर आरोपीला अटक

High Tech Copy in Jail Police Recruitment Written Exam | कारागृह पोलीस भरती लेखी परीक्षेत हायटेक कॉपी

High Tech Copy in Jail Police Recruitment Written Exam

योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
कारागृह पोलीस भरती लेखी परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होणार नाही असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात एका उमेदवाराने चक्क हायटेक कॉपी केली. ‘माईक स्पाय’ या डिव्हाईसच्या माध्यमातून पेपर सोडविणाऱ्या कॉपीबहाद्दराला पोलिसांनी अटक केली आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

राज्यभरात पोलीस भरती सुरु असून सध्या लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेत कुणीही कॉपी करु नये म्हणून दक्षता घेण्यात येत आहे. ‘स्पाय माईक’च्या मदतीने कॉपी करुन पेपर सोडवत असल्याची कुणकुण पोलीस अधिकाऱ्यांना होती. मानकापूर येथील क्रीडा संकुलात कारागृह शिपाई पद भरती २०२२-२३ साठी लेखी चाचणी परीक्षा घेतली जात आहे. २९ सप्टेंंबरला दुपारी चाचणी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत दुपारी ३.२० वाजताच्या सुमारास ‘चेस्ट’ क्रमांक २५०३७ असलेला आरोपी उमेदवार किसन जोनवाल (बाभुलगाव, वैजापुर, छत्रपती संभाजीनगर) याने परीक्षा उतीर्ण होण्याकरिता बाहेरील त्याचा साथीदार आरोपी जीवन काकरवाल (२९, रघुनाथपूर वाडी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) याच्यासोबत कट रचला. ते परीक्षेतील प्रश्न ‘माईक स्पाय’ अशा ईलेक्ट्रानिक डिव्हाईसच्या वापराने सोडवत असल्याचे दिसून आले. जीवन बाहेरून किसनला उत्तरे सांगत होता. मात्र पोलिसांनी किसनला रंगेहाथ पकडले. मानकापूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (२), (४), ६१(२), (ए), २२३ सहकलम ६६ (ड) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसनचा साथीदार जीवन काकरवाल फरार झाला आहे.

केंद्रावरील तपासणीत दुर्लक्ष ?
परीक्षा केंद्रावर उमेदवारांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र तरीदेखील किसन हा स्पाय माईक घेऊन परीक्षा केंद्रात पोहोचला. त्याने काही प्रश्नांची उत्तरदेखील त्यामाध्यमातून लिहीली होती. हा प्रकार सुरू असताना केंद्रावरील पर्यवेक्षकांच्या नजरेत हा प्रकार आला नाही का व तपासणीत दुर्लक्ष कसे काय झाले असा सवाल उपस्थित होत आहे.

Web Title: High Tech Copy in Jail Police Recruitment Written Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.