घरावरील उच्च दाबाच्या विद्युत तारा धाेकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:06 AM2020-11-29T04:06:32+5:302020-11-29T04:06:32+5:30
पिपळा (केवळराम) : स्थानिक इदगाह व हरिभाऊ ले-आऊट भागातील काही घरांवरून ११,००० केव्ही क्षमतेच्या विद्युत तारा गेल्या आहेत. अलीकडच्या ...
पिपळा (केवळराम) : स्थानिक इदगाह व हरिभाऊ ले-आऊट भागातील काही घरांवरून ११,००० केव्ही क्षमतेच्या विद्युत तारा गेल्या आहेत. अलीकडच्या काळात त्या लाेंबकळल्याने तसेच बहुतांश घरे स्लॅबची असून, स्लॅबवर नागरिकांचा वावर असल्याने त्या तारा धाेकादायक ठरत आहे. वारंवार मागणी करूनही महावितरण कंपनी त्या बदलवित नसल्याने नागरिकांमध्ये असंताेष निर्माण हाेत आहे.
ही उच्च दाबाची विद्युत वाहिनी पूर्वी सरळ हाेती. कालांतराने त्या तारा लाेंबकल्याने घराच्या आणखी जवळ आल्या. या तारा इदगाह ते हरिभाऊ आऊट अशा गेल्या असून, त्याखाली एकूण १७ घरे आहेत. ही सर्व घरे स्लॅबची असल्याने घरातील मुलांसह महिला व ज्येष्ठांचा घराच्या स्लॅबवर सतत वावर असताे. त्या तारांमधून उच्च दाबाच्या विजेचे वहन हाेत असल्याने तारांना स्पर्श न करता विशिष्ट अंतरावरून विजेचा धक्का लागण्याची व त्यातून अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही समस्या साेडविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली. मात्र, कुणीही दखल घेतली नाही, असा आराेप स्थानिकांनी केला आहे. या भागात व तारांच्या खाली घरांचे बांधकाम केले जात आहे. संभाव्य धाेका टाळण्यासाठी महावितरण कंपनीने या तारा भूमिगत टाकाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.