नागपुरात सर्वाधिक अपघात कार्यालय सुरू व सुटण्याच्या वेळेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:50 AM2020-01-13T10:50:51+5:302020-01-13T10:51:16+5:30

नागपुरात कार्यालय सुरू होणे व सुटण्याच्या कालावधीतच सर्वात जास्त अपघात होत असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे.

The highest accident in Nagpur is at the time of office start and closed | नागपुरात सर्वाधिक अपघात कार्यालय सुरू व सुटण्याच्या वेळेतच

नागपुरात सर्वाधिक अपघात कार्यालय सुरू व सुटण्याच्या वेळेतच

googlenewsNext


‘ऑफिस’ची घाई, जीवावर येई
: ‘पार्टीटाइम’ची वेळदेखील धोकादायकच
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील इतर मोठ्या शहरांप्रमाणे नागपुरातदेखील कार्यालये सुरू होण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत रस्त्यांवर जास्त गर्दी दिसून येते. कार्यालयाला पोहोचण्यासाठी किंवा घरी लवकर जाण्यासाठी अनेकदा वाहनांची गती वाढते व हाच वेग मृत्यूला आमंत्रण देणारा ठरतो. नागपुरात कार्यालय सुरू होणे व सुटण्याच्या कालावधीतच सर्वात जास्त अपघात होत असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे. २०१८ मध्ये शहरात झालेल्या अपघातांपैकी ३५ टक्क्यांहून अधिक अपघात हे सकाळी ९ ते १२ व सायंकाळी ६ ते ९ या कालावधीत झाले आहेत.
‘एनसीआरबी’ने (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) जारी केलेल्या २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या आकडेवारीकडे नजर टाकल्यावर संबंधित बाब समोर आली आहे. या अहवालात २४ तासांना एकूण आठ भागात विभागण्यात आले व दर तीन तासानिहाय झालेल्या अपघाताची आकडेवारी जाहीर करण्यात आली. नागपूर शहरातील बहुतांश सरकारी आस्थापना, बँका, खासगी कार्यालये, महाविद्यालये सकाळी ९ ते १२ या वेळेतच सुरू होतात, तर सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत सुटतात. चारही वर्षांच्या आकडेवारीत सर्वाधिक अपघात याच वेळेत झाल्याची बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. २०१८ सालच्या आकडेवारीनुसार त्या वर्षात नागपुरात १३४० अपघात झाले. यात २८४ लोकांना जीव गमवावा लागला. यातील सर्वाधिक २९१ अपघात हे सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत झाले, तर सकाळी ९ ते १२ या कालावधीत १८४ अपघात झाले. २०१७ साली एकूण १४२१ अपघात झाले होते व त्यातील ३५.४७ टक्के अपघात हे संबंधित कालावधीतील होते. सकाळी ९ ते १२ या कालावधीत २६० व सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत २२९ अपघात झाले होते. २०१५ व २०१६ साली कार्यालये सुरू होणे व सुटणे या कालावधीत अनुक्रमे २८.४९ टक्के व ३१.३२ टक्के अपघात झाले होते.

अपघातांसंदर्भात जनजागृतीचे गडकरींचे निर्देश
शहरात होणाऱ्या अपघातांबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे. ‘लोकमत’नेदेखील यासंदर्भात प्रकाश टाकला. २०१५ पासून अपघातांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. परंतु तरीदेखील अपघातमुक्त शहर व्हावे यासाठी गडकरी यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात त्यांनी विशेष बैठक घेतली व अपघात कमी व्हावे यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

उपराजधानीत ‘पार्टी’ कल्चर वाढले
गेल्या काही वर्षांपासून नागपुरात ‘पार्टी कल्चर’ वाढीस लागले आहे. साधारणत: शहराबाहेरील हॉटेल्स, ढाबे, पब्स इत्यादी ठिकाणी ‘पार्टी’ करण्यावर अनेकांचा भर असतोे. अनेक वेळा ‘पार्टी’मध्ये मद्यप्राशन झाल्यास त्याचा परिणाम वाहन चालविण्यावर होतो. कधी वेगाच्या अतिउत्साहात, तर कधी नियंत्रण सुटल्यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जाते. रात्री ९ ते १२ या वेळेत २०१५ मध्ये २२३, २०१६ मध्ये २२६, २०१७ मध्ये २०२ तर २०१८ मध्ये १६५ अपघात झाले. यातील अनेक अपघात जीवघेणे ठरले.

Web Title: The highest accident in Nagpur is at the time of office start and closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात