महाराष्ट्र होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलाला सर्वाधिक प्रेसिडेंट मेडल
By नरेश डोंगरे | Published: August 14, 2023 08:48 PM2023-08-14T20:48:38+5:302023-08-14T20:48:54+5:30
अत्यंत प्रतिष्ठेचे पदक : २०१६ पासून अडकली होती गाडी
नागपूर : होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलात उल्लेेखनीय सेवा देऊन महाराष्ट्रातील जवानांनी देशातील इतर प्रांताच्या तुलनेत सर्वाधिक राष्ट्रपती पदके (प्रेसिडेंट मेडल) मिळवली आहेत. देशात सर्वाधिक पदके मिळविण्याचा बहुमान होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलाला प्राप्त झाल्याचे आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाले आहे.
अत्यंत मानाचे समजले जाणारे प्रेसिडेंट मेडल दरवर्षी होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलाला घोषित केले जाते. उल्लेखनीय सेवेसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अशा दोन गटांत ही मानाची पदके दिली जातात. याही वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी जाहीर झाली असून, प्रांतनिहाय पदकांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र ५, आसाम ४, मध्य प्रदेश ४, गोवा ४, पंजाब ४, उत्तर प्रदेश ४, मेघालय ३, छत्तीसगड ३, ओडिशा ३, पंजाब ३, दिल्ली २, हिमाचल प्रदेश २, तामिळनाडू २, तेलंगणा २, लद्दाख १, सिक्कीम १ आणि त्रिपुराला १ पदक मिळाले.
महाराष्ट्रातील पदक प्राप्त अधिकारी, जवान
तुषार चंद्रकांत वरंडे (केंद्र कमांडर, होमागार्ड सातारा), अय्युबखान अहमदखान पठाण (ऑफिसर कमांडिंग, होमगार्ड, नाशिक), राजेंद्र पांडुरंग शहाकर (होमगार्ड, अमरावती), सुधाकर पांडुरंग सूर्यवंशी (नागरी संरक्षण विभागाचे वरिष्ठ सहायक उपनियंत्रक, मुंबई) आणि विजय जनार्दन झावरे (फायर रेस्क्यू लीडर, नागरी संरक्षण, मुंबई)
होमगार्ड आणि नागरी संरक्षण दलात उल्लेखनीय सेवा देऊनही २०१६ पासून गुणवंतांना पदके मिळत नव्हती. यावर्षी देशात सर्वाधिक पदके मिळविण्याचा मान महाराष्ट्रच्या दलाला मिळाल्याबद्दल मनस्वी आनंद झाला. - डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस महासंचालक, होमगार्ड आणि नागरी संरक्षण दल, मुंबई