सेवेचा परमोच्च बिंदू म्हणजे ईश्वरप्राप्ती : जयवंत बोधले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:13 AM2019-11-19T00:13:04+5:302019-11-19T00:39:00+5:30
मातृपितृसेवा, समाजसेवा आणि राष्ट्रसेवा अशा विविध माध्यमातून केली जाणारी सेवा अंतिमत: परमेश्वराच्या चरणीच रुजू होते. सेवाधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सेवेचा परमोच्च बिंदू म्हणजे ईश्वरप्राप्ती आहे, असे प्रतिपादन वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ मानकुजी महाराज बोधले यांचे वंशज अॅड. जयवंत बोधले यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मातृपितृसेवा, समाजसेवा आणि राष्ट्रसेवा अशा विविध माध्यमातून केली जाणारी सेवा अंतिमत: परमेश्वराच्या चरणीच रुजू होते. सेवाधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सेवेचा परमोच्च बिंदू म्हणजे ईश्वरप्राप्ती आहे, असे प्रतिपादन वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ मानकुजी महाराज बोधले यांचे वंशज अॅड. जयवंत बोधले यांनी केले. सच्चिदानंद मंडळातर्फे सायंटिफिक सभागृहात आयोजित ‘सेवाधर्माचा परिणाम’ या विषयावरील त्रिदिवसीय व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
नागपूर जिल्ह्यातील संत श्री भैयाजी महाराज रचित ‘अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्र’ या ग्रंथातील सेवाधर्माचा परिणाम या विषयावर ही त्रिदिवसीय व्याख्यानमाला आयोजित आहे. सेवेच्या फळप्राप्ती आणि ब्रह्मज्ञानाचा संबंधही अल्पशब्दांत त्यांनी यावेळी विवेचित केला. सेवाधर्म व प्रार्थना आध्यात्मिक स्वरूपात भगवंताकडे केली असता साधकाला त्याचा लाभ होतोच, असे अॅड.जयवंत बोधले म्हणाले. प्रपंचात राहून सेवा करणे आणि परमार्थात राहून सेवा करणे यातील भिन्नतेचे विश्लेषण त्यांनी केले. विवेचनात त्यांनी श्रीज्ञानेश्वरी आणि प्रार्थनास्तोत्रातील ओळींचा आधार घेत विषयवस्तू मांडले.
यावेळी राजे रघुजी भोसले (पंचम), शिवशक्तीपीठ उमरेडचे शिवयोगी दत्तामहाराज जोशी, श्रीरामपंत जोशी महाराज आणि गोंदवलेकर महाराजांचे नामधारक बाबासाहेब कुळकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. अॅड.मिलिंद केदार यांनी प्रास्ताविक केले तर अंजली पाठक यांनी संचालन केले. यावेळी जिव्हाळा फाऊंडेशनच्या विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाओ’चा जागर केला.