तंबाखूमुळे मुख कर्करोगाचा सर्वाधिक धोका : वैभव कारेमोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:20 AM2020-05-31T00:20:26+5:302020-05-31T00:25:09+5:30
तंबाखूमुळे मुख कर्करोग होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. शिवाय जीभ, गाल, घसा, अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचीही भीती असते. तंबाखू हृदयासाठीही धोकादायक ठरतो. कारण, धूम्रपानाच्या तुलनेत तंबाखू खाल्ल्याने रक्तात मोठ्या प्रमाणात निकोटीन मिसळते. असे असताना शासकीय दंत महाविद्यालयात व रुग्णालयात (डेन्टल) वर्षाकाठी साधारण एक लाख रुग्ण उपचारासाठी येत असताना यातील ४७ हजारावर रुग्ण विविध प्रकारात तंबाखू खाणारे असतात. अलीकडे याचे प्रमाण वाढत असल्याची माहिती डेन्टलचे सामाजिक दंतशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वैभव कारेमोरे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तंबाखूमुळे मुख कर्करोग होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. शिवाय जीभ, गाल, घसा, अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचीही भीती असते. तंबाखू हृदयासाठीही धोकादायक ठरतो. कारण, धूम्रपानाच्या तुलनेत तंबाखू खाल्ल्याने रक्तात मोठ्या प्रमाणात निकोटीन मिसळते. असे असताना शासकीय दंत महाविद्यालयात व रुग्णालयात (डेन्टल) वर्षाकाठी साधारण एक लाख रुग्ण उपचारासाठी येत असताना यातील ४७ हजारावर रुग्ण विविध प्रकारात तंबाखू खाणारे असतात. अलीकडे याचे प्रमाण वाढत असल्याची माहिती डेन्टलचे सामाजिक दंतशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वैभव कारेमोरे यांनी दिली.
डॉ. कारेमोरे म्हणाले, अनेक रोगांच्या जन्माचे कारण तंबाखू आहे. तंबाखूच्या सेवनाने कॅन्सरचा धोका वाढतो. तोंडासोबतच पेंक्रियाटिक कॅन्सर, अन्ननलिका आणि पोटाच्या कॅन्सरलाही तंबाखू कारणीभूत ठरते. तंबाखूच्या सेवनामुळे पचनतंत्रातील कोणत्याही भागात कॅन्सर होण्याची शक्यता अनेक पटीनेही वाढते. हिरड्यांचा आजार आणि हिरड्या खराब होण्याची शक्यता वाढते. तोंडाच्या आत कॅन्सर होण्याची क्षमता असणारे पांढरे डाग, दात कमजोर होणे, पूर्णत: दात नष्ट होण्याचीही शक्यता असते. तंबाखूचे सेवन व तपकिरी ओढण्याच्या सवयीमुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका होण्याचा संबंध असल्याचे काही अभ्यासातून समोर आले आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरण्यासही कारणीभूत
डॉ. कारेमोरे म्हणाले, लॉकडाऊन असल्याने सध्या पानठेले बंद आहेत. तरीही अनेक लोक खर्रा, गुटखा किंवा तंबाखू खाऊन सार्वजनिक परिसरात थुंकताना दिसून येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे करणे धोकादायक ठरू शकते. कारण थुंकीत तोंडातील लाळ मिसळलेली असते. थुंकणारा व्यक्ती कोरोनाबाधित असल्यास त्याच्या थुंकीतील विषाणू लाळेतील ओलाव्यामुळे रस्त्यावर बराच वेळ टिकून राहू शकतात. या थुंकीवर पाय पडून विषाणू घरापर्यंत किंवा इतरत्र पसरू शकतात. यामुळे थंबाखू न खाणे आणि सार्वजनिक परिसरात न थुंकणे या दोन्ही सवयी आपल्याला लावून घेणे आता गरजेच्या झाल्या आहेत.
तोंड न उघडणाऱ्या आजाराचे हजार रुग्ण
डेन्टलमध्ये गेल्या वर्षी साधारण एक लाख लोकांनी उपचार घेतला. यात ४७ हजार लोकांनी तंबाखू खात असल्याचे मान्य केले. यात एक हजार लोकांचे तोंड सामान्याप्रमाणे उघडत नसल्याचे समोर आले. या ४७ हजारांपैकी १२२ रुग्णांना तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका होता. यातील ५००वर लोक ‘प्री-कॅन्सर’च्या टप्प्यात होते. अशा रुग्णांनी योग्य उपचार न घेतल्यास १० वर्षांत कॅन्सर होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते.
तंबाखू खाणारा प्रत्येक व्यक्ती ‘डेंजर झोन’मध्ये
तंबाखू खाणाऱ्या १०० लोकांमधून सुमारे ३३ जणांना कॅन्सर होण्याचा धोका असतो. गाल, जीभ, ओठ, टाळू, हिरड्या, जिभेखालील भाग अशा तोंडाच्या कोणत्याही भागात हा रोग होऊ शकतो. म्हणूनच तंबाखू खाणारा प्रत्येक व्यक्ती ‘डेंजर झोन’मध्ये असतोच.