नागपूर रेल्वेस्थानकावर ‘हायअलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:56 AM2019-08-10T10:56:15+5:302019-08-10T10:57:10+5:30
संविधानातून कलम ३७० रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता लक्षात घेता नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधानातून कलम ३७० रद्द करण्यात आले. या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता लक्षात घेता नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारपासून आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस सतर्क झाले असून, रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाला ५ दिवस शिल्लक असल्यामुळेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर रेल्वेस्थानक देशाच्या मध्यभागी आहे. रेल्वेस्थानकावरून दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या मार्गावर गाड्यांची वर्दळ असते. दररोज १५० पेक्षा अधिक प्रवासी गाड्या ये-जा करतात. अलीकडेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर रेल्वेस्थानकावरील मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर प्रवेशद्वार बंद करण्यात आले. लगेज स्कॅनिंग मशीनवरून तपासणी केल्यानंतरच प्रवाशांना आत सोडले जात आहे. संशय येताच प्रवाशांची तपासणी केली जात आहे. दिल्ली, कोलकाताकडून येणाऱ्या गाड्यांवर विशेष नजर असून गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांचे श्वान पथक, बॉम्ब शोध आणि नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे.