उच्चशिक्षित पतीपत्नीचा वाद पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 08:55 PM2020-07-30T20:55:05+5:302020-07-30T20:56:33+5:30
घरगुती कारणावरून निर्माण झालेल्या वादात उच्चशिक्षित विवाहितेने बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक करून छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरगुती कारणावरून निर्माण झालेल्या वादात उच्चशिक्षित विवाहितेने बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक करून छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव अपूर्वा स्वयम जोशी (वय २८) आहे. अपूर्वा आणि तिचे कुटुंबीय बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीरी कॉलनीत राहतात. अपूर्वाच्या माहेरची आणि सासरची मंडळी सधन आहेत. अपूर्वा तसेच तिचा पती स्वयम हे दोघेही उच्चशिक्षित आहे. पती डॉक्टर असून अपूर्वा फॅशन डिझाइनर म्हणून काम करते. तर २०१८ मध्ये शादी डॉट कॉम या पोर्टलवरील स्वयम जोशी यांची प्रोफाईल पाहून अपूर्वाच्या कुटुंबीयांनी हा पारिवारिक संबंध जुळवून आणला. २ सप्टेंबर २०१८ ला अपूर्वा आणि स्वयम या दोघांचे साक्षगंध झाले आणि मार्च २०१९ ला त्यांचे लग्न देखील झाले. थाटामाटात झालेल्या लग्न समारंभानंतर हे दोघेही ऑस्ट्रेलियाला गेले. तेथे दोन महिने राहिले. तेथून त्यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या. छोट्या छोट्या कारणावरून त्यांचे वाद होऊ लागले त्यानंतर ऑस्ट्रेलियाला परत जाण्यावरून हा वाद वाढत गेला. प्रकरण भरोसा सेलकडे गेले. तेथे अनेक महिने समुपदेशनाच्या नावाखाली निघाले. भरोसा सेलमध्ये मनासारखे होत नसल्याचे पाहून अखेर अपूर्वाने बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
स्वयम जोशीने शादी डॉट कॉमवर फेक प्रोफाईल अपलोड करून आपली फसवणूक केली. लग्नानंतरही शारीरिक व मानसिक छळ केला, असे अपूर्वाने पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर बुधवारी स्वयम यांच्यासह तिघांविरुद्ध फसवणूक करणे आणि शारीरिक व मानसिक त्रास देणे या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.