नागपुरात कचरा संकलनासाठी हायटेक ट्रान्सफर स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:08 AM2018-11-29T10:08:01+5:302018-11-29T10:09:49+5:30
च्छ शहरांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळण्यासाठी स्वच्छ व सुंदर नागपूर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची गरज आहे. यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे.
गणेश हूड।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळण्यासाठी स्वच्छ व सुंदर नागपूर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची गरज आहे. यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. सफाई कर्मचारी घराघरातून कचरा गोळा करून पीकअप पॉर्इंटवर जमा करतात. नागरिकही या ठिकाणी कचरा आणून टाकतात. यामुळे अस्वच्छता पसरते. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. तसेच शहर विदु्रप होते. याला आळा घालण्यासाठी इंदूर शहराच्या धर्तीवर नागपूर महापालिका प्रत्येक झोन स्तरावर कचरा संकलनासाठी हाय-टेक ट्रान्सफर स्टेशन उभारणार लकडगंज झोन वगळता अन्य झोनमध्ये महापालिकेच्या जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नासुप्र, कृषी विद्यापीठ तसेच महसूल विभागाच्या जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. एका ट्रान्सफर स्टेशनसाठी दीड ते दोन कोटींचा खर्च येणार आहे. ट्रान्सफर स्टेशनमध्ये कॉम्पॅक्टर, बाल्टी आणि हुक-लोडरसह तीन प्रमुख भाग राहणार आहेत. गाडीतील ओला व सुका कचरा थेट कंटेनरमध्ये टाकण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी मनुष्यबळ कमी लागणार असल्याने भविष्यात कचरा संकलनाच्या खर्चात मोठ्याप्रमाणात बचत होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रान्सफर स्टेशन उभारल्या जाणार असल्याने परिसरातील नागरिकांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही. ओला आणि सुका कचरा वाहून नेण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कंटेनरचा वापर केला जाणार आहे. सध्या शहरातील घराघरातून गोळा केलेला कचरा साठवण्याची व्यवस्था नाही. तो पिकअप पॉर्इंटवर साठविला जातो. त्यानंतर तो भांडेवाडी येथे वाहून नेला जातो. कचरा साठविण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध नसल्याने काही प्रभागात तो रस्त्यांवर जमा केला जातो. दुपारपर्यंत तो तसाच पडून असतो. त्यानंतर कंटेनरच्या माध्यमातून भांडेवाडी येथे नेला जातो. दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास होतो. ट्रान्सफर स्टेशनमधून कचरा अधिक क्षमतेच्या मोठ्या कंटेनरमधून वाहून नेला जाणार आहे. यामुळे वाहनावरील खर्चातही बचत होणार आहे.
यासाठी शहरात जागांचा शोध घेतला जात आहे. ट्रान्सफर स्टेशनसाठी जवळपास एक एकर जागा लागणार आहे.
नासुप्रकडे जागांची मागणी
ट्रान्सफर स्टेशनसाठी मोठी जागा लागणार आहे. शहरात महापालिकेकडे अशा स्वरूपाच्या जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नासुप्रने आपल्या मालकीच्या जागा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी महापालिकेने केली आहे. तसेच कृ षी विद्यापीठ व महसूल विभागाकडे जागांची मागणी केली जाणार आहे.
जागांचा शोध घेण्यासाठी सर्वे
इंदूर शहराच्या धर्तीवर नागपूर शहरातही कचरा संकलनाची अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याची गरज आहे. याचा विचार करता १० झोनमध्ये १० ट्रान्सफर स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी शहरात जागांचा शोध घेण्यात आला. परंतु लकडगंज वगळता अन्यत्र महापालिकेकडे प्रशस्त जागा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी(स्वच्छता)