रामटेकसाठी काँग्रेसमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:00 AM2019-03-26T01:00:00+5:302019-03-26T01:00:02+5:30
काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवारीवरून अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच झाल्यानंतर सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘हायव्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. काँग्रेसतर्फे माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. मात्र, तासाभरानंतरच पक्षाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री नितीन राऊत यांनी आपल्याला दिल्लीहून फोन आला असून, उमेदवारी मिळाल्याचा दावा केला. दुपारी २.३० वाजता उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी राऊत समर्थकांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात पोहचले. मात्र पक्षाचा अधिकृत ‘बी’ फॉर्म त्यांच्याकडे नसल्याने, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला नाही. तब्बल दोेन तासचाललेल्या राजकीय नाट्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवारीवरून अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच झाल्यानंतर सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘हायव्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळाला. काँग्रेसतर्फे माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. मात्र, तासाभरानंतरच पक्षाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री नितीन राऊत यांनी आपल्याला दिल्लीहून फोन आला असून, उमेदवारी मिळाल्याचा दावा केला. दुपारी २.३० वाजता उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी राऊत समर्थकांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात पोहचले. मात्र पक्षाचा अधिकृत ‘बी’ फॉर्म त्यांच्याकडे नसल्याने, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला नाही. तब्बल दोेन तासचाललेल्या राजकीय नाट्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.
सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास किशोर गजभिये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यासह उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्यांच्यासमवेत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, नाना गावंडे, राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह नितीन राऊत व आमदार सुनील केदार हे देखील उपस्थित होते. या सर्वांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे किशोर गजभिये यांचा उमेदवारी अर्ज सादर केला. यानंतर गजभिये यांच्यासह सर्वच काँग्रेस नेते नागपूरचे काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या रॅलीत सहभागी झाले. बाहेर काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन सुरू असतानाच एकाएक आ. केदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उत्पादन शुल्क विभागाच्या एका कक्षात राऊत यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले व राऊत यांचा काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज भरायचा असल्याचे सांगितले. याचवेळी राऊत यांचे सुपुत्र कुणाल यांनी राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांचा फोन आला असून, त्यांनी नितीन राऊत यांना रामटेकसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे, असे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. यानंतर राजेंद्र मुळक यांनाही आ. केदार उपस्थित असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कक्षात बोलावून घेण्यात आले. मात्र १० मिनिटातच मुळक तेथून निघून गेले. तोवर प्रकाश वसू, नरेंद्र जिचकार आदींनी राऊत यांचा अर्ज भरण्याची तयारी पूर्ण केली. यानंतर केदार हे राऊत यांना घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गेले व राऊत हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. यावेळी प्रफुल्ल गुडधे, कृष्णकुमार पांडे हे देखील सोबत होते. मात्र राऊत यांच्या अर्जासोबत पक्षाचा ‘बी’ फॉर्म नसल्याचे सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. अपक्ष म्हणून अर्ज भरता येईल, असेही स्पष्ट केले. मात्र, तोवर वेळ संपली होती. शेवटी केदारांनीही एवढी उठाठेव करूनही काहीच साध्य झाले नाही. उलट जिल्ह्यातून आलेले शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमधील ही गटबाजी पाहून निराश झाले.
असा घडला राजकीय ड्रामा
- किशोर गजभिये यांनी दुपारी १२.३० च्या सुमारास उमेदवारी अर्ज सादर केला.
- तासभरानंतर सुमारे १.३० वाजता केदार यांनी राऊत यांना सोबत घेत अर्ज भरण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली.
- दुपारी २.३० च्या सुमारास राऊत हे केदार व समर्थकांसह रामटेकचे निवडणूक अधिकारी श्रीकांत फडके यांच्या कक्षात अर्ज सादर करण्यासाठी गेले.
- राऊत यांनी ‘काँग्रेस पक्ष’ लिहिलेला अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केला. मात्र निवडणूक अधिकाऱ्याने ‘बी’ फॉर्म नसल्याने अर्ज स्वीकारता येणार नाही, असे स्पष्ट केले.
- यावेळी केदार यांनी लगेच प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. रामटेकमधून राऊत यांनी काँग्रेसकडून अर्ज सादर केला असून त्यांना पक्षाचा ‘बी’ फॉर्म व्हॉट्स अॅप किंवा इमेलवर पाठवा अशी मागणी केली. यावर चव्हाण यांनी पक्षाने रामटेकमध्ये किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली असून त्यांना ‘बी’ फॉर्म दिला असल्याचे स्पष्ट केले. तुम्ही या विषयावर प्रदेश काँग्रेस सरचिटणीस गणेश पाटील यांच्याशी संपर्क साधा असे चव्हाण यांनी केदार यांना सुचविले.
- यानंतर केदार यांनी पाटील यांच्याशी संपर्क साधून ‘बी’ फॉर्मची मागणी केली. पाटील यांनीही चव्हाण यांच्यासारखेच उत्तर दिले. तोवर २.५५ झाले होते. यानंतर केदार यांनी तिथे उपस्थित असलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाची नियमावली दाखवत व्हॉट्सअॅप किंवा इमेलवर आलेला ‘बी’ फॉर्म स्वीकारला जाणार नाही, असे स्पष्ट केले.
- त्यामुळे राऊत यांना अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर करण्याशिवाय पर्याय नव्हता. या सर्व घडामोडीत उमेदवारी अर्ज सादर करण्याची वेळ संपली आणि राऊत उमेदवारी अर्ज सादर न करताच ३.१० वाजता बाहेर पडले. त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलणेही टाळले.