राजमार्ग प्राधिकरणाची १ कोटी ३९ लाखांची हमी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:50 AM2018-08-17T00:50:49+5:302018-08-17T00:51:30+5:30
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी आणि कागदपत्रांचा वापर करून एका आरोपीने प्राधिकरणाची १ कोटी, ३९ लाखांची बँक हमी रद्द करवून घेतल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, २० जून २०१६ मध्ये घडलेल्या या घटनेची माहिती तब्बल दोन वर्षांनंतर पुढे आली. त्यानंतर प्रकल्प संचालक अभिजित प्रल्हादराव जिचकार (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी आणि कागदपत्रांचा वापर करून एका आरोपीने प्राधिकरणाची १ कोटी, ३९ लाखांची बँक हमी रद्द करवून घेतल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, २० जून २०१६ मध्ये घडलेल्या या घटनेची माहिती तब्बल दोन वर्षांनंतर पुढे आली. त्यानंतर प्रकल्प संचालक अभिजित प्रल्हादराव जिचकार (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
जिचकार यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात आरोपीने २० जानेवारी २०१६ ला प्रकल्प संचालक, पी यू-२, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयाचे बनावट लेटर तयार करून करारासंबंधाने ते पत्र बँक आॅफ इंडियाच्या ओपेरा शाखा मुंबईला पाठवले. या पत्रात आरोपीने प्राधिकरणाशी झालेल्या १ कोटी, ३९ लाख, १७ हजारांची बँक हमी रद्द करण्याची विनंती केली. त्यावर प्रकल्प संचालक अभिजित जिचकार यांची बनावट स्वाक्षरी आरोपीने केली. त्या पत्राच्या आधारे बँकेने प्राधिकरणाची हमी रद्द केली. दोन वर्षे झाल्यानंतर आठ दिवसांपूर्वी या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यानंतर जिचकार यांनी गेल्या आठवड्यात अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार भीमराव खंदाळे यांंनी आपल्या सहकाºयांकडून कागदपत्रांची सविस्तर चौकशी करून घेतली. त्यानंतर मंगळवारी पोलीस उपनिरीक्षक एन. डी. शेख यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
---
घरभेदीकडूनच गुन्हा !
हा गुन्हा प्राधिकरणाशी संबंधित असलेल्याकडूनच झाला असावा, असा संशय आहे. कोणत्या बँकेशी करार आहे, त्यात कुणाशी हमी रद्द करण्यासंबंधीचा पत्रव्यवहार करावा लागतो, हे केवळ प्राधिकरणाशी संबंधित व्यक्तीलाच माहीत असू शकते. त्यामुळे संबंधित व्यक्तीच या प्रकरणात आरोपी असावा, असा पोलिसांचा कयास आहे. विशेष म्हणजे, एवढ्या मोठ्या रकमेची बँक हमी रद्द करण्यापूर्वी बँक अधिकाºयांनी प्रकल्प संचालक किंवा अन्य वरिष्ठांशी चर्चा का केली नाही, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी अंबाझरी पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना केले जाणार असल्याचे ठाणेदार खंदाळे यांनी लोकमतला सांगितले.
---