मृत्यूचा महामार्ग कामठी

By admin | Published: June 25, 2014 01:21 AM2014-06-25T01:21:39+5:302014-06-25T01:21:39+5:30

वाहतूक नियमांचे पालन होते किंवा नाही, यावर देखरेख करण्याचे काम वाहतूक पोलीस विभागाचे आहे. वाहतूक नियमांचे पालन जितके कार्यक्षम राहील तितकी अपघातांची संख्या कमी राहील.

Highway of Death | मृत्यूचा महामार्ग कामठी

मृत्यूचा महामार्ग कामठी

Next

पोलिसांच्या नजरेखाली : रोज ३०० वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक
नागपूर : वाहतूक नियमांचे पालन होते किंवा नाही, यावर देखरेख करण्याचे काम वाहतूक पोलीस विभागाचे आहे. वाहतूक नियमांचे पालन जितके कार्यक्षम राहील तितकी अपघातांची संख्या कमी राहील. मात्र नागपुरात उलट स्थिती आहे. विशेषत: एकट्या कामठी मार्गावर वाहतूक पोलिसांच्या नजरेखाली अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. टाटा मॅजिक, अ‍ॅपे, सहा सीटर अशा ३०० वाहनातून ही अवैध वाहतूक बिनधास्त सुरू आहे.
विशेष म्हणजे हा मार्ग गांधीबाग आणि इंदोरा पोलीस वाहतूक विभागाच्या अंतर्गत येतो. यातील एकट्या इंदोरा विभागात मागील १४ महिन्यांत या मार्गावर ५७ अपघात झाले. यात ५१ जण जखमी तर तब्बल २१ जणांना प्राणाला मुकावे लागले
आॅल इंडिया परमिट असलेल्या १०० वर मॅजिक गाड्या कामठी रोडवर रोज अवैध प्रवासी घेऊन धावतात. सहा सीटस्ची परवानगी असताना १५-२० प्रवासी बसवून भन्नाट वेगाने ही वाहने धावतात. नियमानुसार या वाहनांना टप्पा वाहतूक करता येत नाही. असे असतानाही व्हेरायटी चौक ते कामठी मार्गावरील सर्व चौकांतून प्रवासी घेताना दिसून येतात. एलआयसी चौकात तर यांचा स्टॅण्ड आहे. पोलिसांसमोर ही वाहतूक सुरू असतानाही कारवाई नावापुरतीच असल्याचे चित्र आहे.
सहा सीटर आॅटोरिक्षाच्या संदर्भात कठोर नियम आहेत. या वाहनाला शहरामधून प्रवासी घेण्यावर प्रतिबंध आहे. असे असतानाही शहर सीमेच्या आत कामठी रोडवरील सर्वच चौकातून प्रवाशांनी भरलेली वाहने दिसतात. यातील बहुसंख्य वाहने १६ वर्षांवरील आहेत.
सात हजाराच्या ‘मॅजिक’
कामठी रोडवर धावत असलेल्या शंभर ‘मॅजिक’ या दरमहा सात हजार रुपये हप्ता देतात. यातील एका चालकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले की, हा हप्ता दिल्याशिवाय या मार्गावर वाहन चालूच शकत नाही. गोलू नावाचा एक गुंड हा हप्ता जमा करतो. त्याचे एका आमदारासोबत सेटिंग आहे.
या हप्त्याची मोठी रक्कम इंदोरा, मीठानीम दर्गा आणि गिट्टीखदान वाहतूक पोलीस विभागाला जाते, म्हणून या मार्गावर कोणीच थांबवीत नाही. जे हप्ता देत नाही त्यांच्यावरच गारपीट होते. विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य वाहने ही नॉन ट्रान्सपोर्टमध्ये नोंदणी झालेली आहेत.
सहा सीटरसाठी तीन हजाराचा हप्ता
नागपूर-कामठी मार्गावर सुमारे १०० सहा सीटर आॅटोरिक्षा धावतात. यातील बहुसंख्य सहा सीटर आॅटोरिक्षा विनापरमीटच्या आहेत. नियमानुसार शहराच्या आत त्यांना प्रवासी घेता येत नाही, तरीही व्हेरायटी चौक ते कामठी अशी बिनबोभाट प्रवासी वाहतूक सुरू असते. यामागील गुपित म्हणजे तीन हजाराचा मासिक हप्ता असल्याचे एका सहा सीटर चालकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले. तो म्हणाला, गांधीबाग व इंदोरा वाहतूक पोलीस विभाग मिळून हा हप्ता दिला जातो. कमरूबाबा नावाचा एक गुंड हा हप्ता गोळा करतो.
अधिकार असताना निलंबनाची कारवाईच नाही
नॉन ट्रान्सपोर्ट म्हणून नोंद असताना प्रवासी वाहतूक करणे हा गुन्हा आहे. तसेच शहरात धावत असलेल्या सर्वच सहा सीटर १६ वर्षांवरील आहे. वाहतूक पोलिसांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाईचे अधिकार आहेत. मात्र सूत्रानुसार आतापर्यंत एकाही मॅजिक किंवा सहा सीटरवर निलंबनाची कारवाई झालेली नाही.
इतर जिल्ह्यातीलही अवैध वाहने याच मार्गावर
कोणीही यावे आणि व्यवसाय सुरू करावा, असा कामठी मार्ग आहे. भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा येथे नोंदणी झालेल्या ‘मॅजिक’ गाड्या या मार्गावर व्यवसाय करतात. (प्रतिनिधी)

Web Title: Highway of Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.