‘हायवे’मुळे नागपूर जिल्ह्यातील ८६ गावांचे अर्थकारण बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 07:30 AM2021-11-11T07:30:00+5:302021-11-11T07:30:02+5:30

Nagpur News पाच राष्ट्रीय महामार्गांना जाेडणाऱ्या नवीन महामार्गाचे निर्मिती कार्य सुरू आहे. या सात राष्ट्रीय महामार्गांमुळे लगतच्या ८६ पेक्षा अधिक गावांमध्ये वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्यात आल्याने त्या गावांचे अर्थकारण बदलत आहे.

Highways changed the economy of 86 villages in Nagpur district | ‘हायवे’मुळे नागपूर जिल्ह्यातील ८६ गावांचे अर्थकारण बदलले

‘हायवे’मुळे नागपूर जिल्ह्यातील ८६ गावांचे अर्थकारण बदलले

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात सहा महामार्गाचे जाळेमहामार्गांना जाेडणाऱ्या नवीन मार्गाची भर

 सुनील चरपे

नागपूर : सर्वांगीण विकासात रस्त्यांची अखंडता व गुणवत्ता महत्त्वाची आहे. नागपूर जिल्ह्यातून सहा वेगवेगळे राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. यातील पाच राष्ट्रीय महामार्गांना जाेडणाऱ्या नवीन महामार्गाचे निर्मिती कार्य सुरू आहे. या सात राष्ट्रीय महामार्गांमुळे लगतच्या ८६ पेक्षा अधिक गावांमध्ये वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्यात आल्याने त्या गावांचे अर्थकारण बदलत आहे.

नागपूर जिल्ह्यातून काेलकाता (पश्चिम बंगाल)- सुरत (गुजरात) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ (एशियन महामार्ग क्रमांक-४६), कन्याकुमारी (तामिळनाडू)-वाराणसी (उत्तर प्रदेश) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-७, नागपूर-बैतूल (मध्य प्रदेश)-जामनगर (गुजरात) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-४७, नागपूर-छिंदवाडा (मध्य प्रदेश)-नरसिंगपूर (मध्य प्रदेश) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४७, नागपूर-वर्धा-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३६१ आणि नागपूर-गडचिराेली-वारंगल (तेलंगणा) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३५३ (सी) असे सहा राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३६१ (सी) वगळता अन्य पाच राष्ट्रीय महामार्गांना जाेडणारा नवीन राष्ट्रीय मार्ग तयार केला आत असून, त्या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहेत. हे सर्व महामार्ग चाैपदरी असून, त्यावरून २४ तास वाहनांची वर्दळ असल्याने या महामार्गालगतच्या गावांमध्ये विविध उद्याेगधंद्यांना चांगले दिवस आले आहेत. या महामार्गालगत हाॅटेल्स, ढाबे, पानटपरीसह इतर धंद्यांची भरभराट हाेत असल्याचेही दिसून आले आहे.

चाैपदरी रस्ते

नागपूर-काेंढाळी - ५० किमी

नागपूर-माैदा - ३० किमी

नागपूर-देवलापार - ६५ किमी

नागपूर-बुटीबाेरी - २२ किमी

नागपूर-सावनेर - ३५ किमी

नागपूर-केळवद - ४५ किमी

नागपूर-उमरेड - ५४ किमी

या तालुक्यांना लाभ

राष्ट्रीय महामार्गांमुळे नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक लाभ नागपूर (ग्रामीण), कामठी, सावनेर व हिंगणा तालुक्यातील गावांना झाला आहे. त्याखालाेखाल लाभ माैदा, कळमेश्वर, हिंगणा, उमरेड, रामटेक व काटाेल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या गावांना झाला आहे. जिल्ह्यातील नरखेड, कुही व पारशिवनी तालुक्यात महामार्ग नाही.

नवीन महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

जिल्ह्यातून गेलेल्या सहापैकी पाच राष्ट्रीय महामार्गांना जाेडणाऱ्या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पारशिवनी, सावनेर, कळमेश्वर, हिंगणा व नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील काही अंतर्गत गावे या या महामार्गालगत आल्याने त्या गावांमध्ये उद्याेगधंद्यांना अनुकूल वातावरण निर्माण हाेत आहे.

प्रवासाचे अंतर व वेळ कमी

या राष्ट्रीय महामार्गांमुळे प्रवासाचे अंतर व वेळ कमी झाले आहे, अशी प्रतिक्रिया काही आंतरराज्यीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह इतर राज्यांमध्ये फळे व भाजीपाला विकायला नेणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या महामार्गावर २४ तास रहदारी असल्याने उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती या महामार्गालगत व्यवसाय करणाऱ्या काही व्यावसायिकांनी दिली.

Web Title: Highways changed the economy of 86 villages in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.